तारवाला चौकात गतिरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष
वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पंचवटीतील तारवालानगर सिग्नलवर गतिरोधक बसवावेत, या मागणीसाठी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिकांनी जिल्हा प्रशासन तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण विरोधात प्रजासत्ताक दिनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक-दिंडोरी मार्गावरील महापालिका हद्दीतील हा मुख्य चौक आहे. सभोवताली शासकीय कार्यालये, मोठी नागरी वसाहत असून सिग्नलवरून दररोज हजारो वाहनधारक, पादचारी ये-जा करतात. पोलीस आणि महापालिका प्रशासनाला गतिरोधकाची निकड दर्शवूनही प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
पंचवटीतील आरटीओ कॉर्नर ते तारवालानगर चौफुली, मोरेमळा चौफुली, मिरची ढाबा सिग्नल या ठिकाणी वाहनांची वर्दळ असल्याने अपघात होत असतात. त्यात दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर चौफुली ही वाहनधारकांसाठी धोकादायक झाली आहे. रात्रीच्या सुमारास महामार्गावरून वाहने भरधाव असतात. ही बाब अपघातांना कारक ठरली आहे. तारवाला सिग्नल चौकातून स्थानिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यापूर्वी प्रभागात या चौकासह इतरत्र अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागल्याची तक्रार नगरसेवक जगदीश पाटील यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तारवालानगर सिग्नलवरील अपघात लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांच्या पुढाकारातून या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले होते. परंतु पालिका प्रशासनाने ते नियमानुसार नसल्याचे कारण दाखवत हटविले. तेव्हापासून हा चौक पुन्हा धोकादायक बनला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यास चौकात अधिकृतपणे गतिरोधक बसविता येईल. परंतु जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत दिरंगाई करीत असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.
सिग्नलवर गतिरोधकाची गरज?
न्यायालयीन निकालाचा संदर्भ देत गतिरोधकाची गरज नसल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील काही सदस्यांचे म्हणणे आहे. गतिरोधकाला मान्यता देण्याचे अधिकार पूर्वी रस्ता सुरक्षा समितीला होते. आता ते अधिकार नेमके कुणाला आहेत याची स्पष्टता केली जात नाही. तारवालानगर सिग्नल चौक परिसरातील रस्ते महापालिकेचे आहेत. यामुळे तिथे कोणते उपाय करायचे त्याची जबाबदारी पालिकेवर आहे. प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शहर परिसरात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी तात्पुरते आणि कायमस्वरूपी उपाययोजनांचे काम प्रगतिपथावर आहे. तारवालानगर चौकातील सिग्नल व्यवस्था वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आहे. यामुळे सिग्नलवर गतिरोधक बनविण्याची गरज नसल्याचे मत प्राधिकरणातील सदस्याने व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष
वाहतुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील जे धोकादायक चौक आहेत, त्यात तारवालानगर सिग्नलचा समावेश आहे. मागील काही वर्षांत या चौकात सातत्याने अपघात होत आहेत. दोन-तीन जणांना प्राणही गमवावे लागले. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवावा, या मागणीसाठी दीड वर्षांपासून अथक पाठपुरावा करूनही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. – जगदीश पाटील (नगरसेवक)