नाशिक : वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची भरती सर्व सेवा नियमाप्रमाणे तत्काळ व कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नाशिक- सापुतारा तसेच नाशिक- कळवण वाहतूक ठप्प झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी बांधवांनी पेसा क्षेत्रात वनजमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, राज्यातील १३ जिल्ह्यांत पेसाची प्रभावी अंमलबजावणी करावी, १७ संवर्ग पेसा क्षेत्रात भरती करावी, अशा मागण्यांसाठी आंदोलन केले. माजी आमदार जिवा पांडु गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल आदिवासी समाज सहभागी झाला. वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हेही सहभागी झाले होते. गुरूवारी सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूकदारांनी अन्य पर्याय धुंडाळण्यास सुरुवात केली. अनेकांनी दत्तनगरमधील रस्त्यावर गर्दी केल्याने त्या रस्त्यावरही कोंडी झाली.काही वाहनधारकांनी पिंपळगावमार्गे प्रवास करणे पसंत केले. आंदोलनामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना कसरत करावी लागली. कोंडीत राज्य परिवहनच्या बसही अडकल्याने प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा…लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

पोलिसांनी ग्रामपंचायतमार्गे वाहतूक वळवली. मोठी वाहने बाजूला करुन लहान वाहनांना रस्ता करुन देत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko protest by adivasi community at vani halts nashik saputara and nashik kalwan traffic psg