Ratan Tata ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा ( Ratan Tata ) यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्रासह देशाने उद्योग जगतातला पितामहा गमावला आहे. राज ठाकरे आणि रतन टाटा यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे होते. राज ठाकरेंच्या हाती जेव्हा नाशिक महापालिकेची सत्ता आली होती तेव्हा नाशिक या ठिकाणी राज ठाकरेंनी पंडीत जवाहरलाल नेहरु वनोद्यान उभारलं. ही संकल्पना राज ठाकरेंची होती. टाटा ट्रस्ट आणि नाशिक महापालिका यांनी उभारलेल्या या प्रकल्पाची भुरळ रतन टाटांना ( Ratan Tata ) पडली होती.

काय म्हणाले होते रतन टाटा?

रतन टाटा ( Ratan Tata ) या उद्यानाच्या उद्घाटनाला आले होते. हे उद्यान पाहून त्यांनी हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे असे गौरवोद्गार काढले होते.नाशिक महापालिकेची सत्ता जेव्हा मनसेला मिळाली तेव्हा पंडीत नेहरु वनोद्यानाचा विकास करण्याचा संकल्प राज ठाकरेंनी सोडला होता. त्यानंतर वनविकास महामंडळाकडे वनोद्यान हस्तांतरण करण्यात आलं. वन मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर महापालिका प्रशासनाला टाटा समुहाने या प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आलं होतं. आजही या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टाटांच्या ( Ratan Tata ) हस्ते उद्घाटन केलेला फलक पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो.

हे पण वाचा- “तुमच्यासाठी श्रद्धांजली हा शब्द…”, रतन टाटांच्या निधनावर प्रवीण तरडेंनी व्यक्त केली हळहळ; पोस्ट करत म्हणाले…

३० जानेवारी २०१७ ला रतन टाटांची नाशिकवारी

३० जानेवारी २०१७ या दिवशी मुंबईहून चार्टर्ड विमानाने रतन टाटा हे उद्यानाचं लोकार्पण करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं. राज ठाकरे आणि रतन टाटा यांनी या उद्यानात ४५ मिनिटं संवाद साधला. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पांडवलेणी या परिसरात हे वनोद्यान आहे. फुलपाखराच्या आकाराचं आकर्षक असं भव्य प्रवेशद्वार पाहून रतन टाटा ( Ratan Tata ) खूप आनंदी झाले होते. तसंच इकोफ्रेंडली कारमधून त्यांनी राज ठाकरेंना बरोबर घेत उद्यानाचा फेरफटका मारला होता.

अशा उद्यानांची शहरांना खरोखर गरज-रतन टाटा

अशा प्रकारच्या उद्यानांची शहरांना खरंच गरज आहे. या उद्यानाने मला प्रभावित केलं आहे. एक इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून मी याकडे पाहतो आहे. महाराष्ट्र आणि भारतात अशा उद्यानांची आवश्यकता आहे. असं रतन टाटा म्हणाले होते. मला खात्री आहे की हे उद्यान वाढत जाईल. राज ठाकरेंनी ही संकल्पना मांडली त्यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. श्वास घ्यायला मुबलक ऑक्सिजन आणि सुखद हिरवळ ही नाशिकच्या नागरिकांना मिळालेली भेट आहे. खूप आनंद आहे की आम्ही या कामात हातभार लावू शकलो आहोत. असंही टाटांनी ( Ratan Tata ) म्हटलं होतं. २०१७ मध्ये रतन टाटा जेव्हा या उद्यानाच्या उद्घाटनासाठी नाशिकला पोहचले होते तेव्हा नाशिककरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.