जळगावमधील चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे सोमवारपासून ब्रह्मोत्सव महोत्सवाला सुरुवात होत आहे. सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव आणि रथोत्सव याअंतर्गत साजरा होणार आहे. हे कार्यक्रम सात ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी आणि विश्वस्तांनी दिली.
हेही वाचा- सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी
शहरातील ठराविक भागात मिरवणूक काढणार
सोमवारी संबंधित वहनावर आरूढ होऊन श्री बालाजी महाराजांची ठराविक भागात मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्त या उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये दिसून येत आहे. करोनाच्या संसर्गामुळे शासकीय नियमांमुळे दोन वर्षे वहनोत्सव मंदिरातच पार पडला होता, तर रथोत्सवही जागच्या जागीच पार पाडून परंपरा जोपासली गेली होती. खानदेशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव सहा आणि सात ऑक्टोबर रोजी होणार आहे.
उत्सवात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन
सहा ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गोल मंदिराजवळील श्री बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल. आशा टॉकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथमार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. तेथे रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहील. सात ऑक्टोबर रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोल मंदिराजवळ येऊन यंदाच्या वहनोत्सव व रथोत्सवाचा समारोप होईल. यानिमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसांची रथयात्राही भरत असते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानच्या पदाधिकार्यांनी केले आहे.