लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुले, स्तनदा, गर्भवती माता यांना शिधा वाटप करण्यात येतो. राज्य शासन यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. आता या शिधा वाटपातही गैरव्यवहार होऊ लागला आहे. हा शिधा काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक अधीक्षकांचे पथक आणि मालेगाव छावणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सटाणा रोडवरील एका गोदामात खासगी व्यापाऱ्याकडे छापा टाकून सुमारे ८३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा शिधा गायब करणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला आहे. सहाय्यक अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक क्षिरसागर, पोलीस निरीक्षक ढोकणे आदींच्या सहकार्याने सटाणा रस्त्यावरील मधुबन हॉटेलजवळील मंगलमूर्ती पॅकेजिंग शेजारी असलेल्या ललित पहाडे यांच्या मालकीच्या गोदामात छापा टाकला असता तेथे पवन अग्रवाल (३८, रा. मारवाडी गल्ली, कॅम्प) हा उपस्थित होता. पवनने गोदाम उघडले असता पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये पाकिटे आढळून आली. कारवाई करताना पुरवठा अधिकारी प्रशांत काथेपुरी, नायब तहसीलदार शरद निकम, केंद्रप्रमुख सुनंदा पवार आदी उपस्थित होते. पोलीस पथकाला छाप्यात दाळ पाकीट, मिरची पावडर, मसाला, हळद पावडरचे पाकीट, चना, गहू असा सुमारे ८२ हजार ८९० रुपयांचा ऐवज मिळून आला.

आणखी वाचा-नाशिक: बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

गोदामात अनेक रिकाम्या गोण्या होत्या. सर्व पाकिटांवर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नॉट फॉर सेल) असा मजकूर होता. येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश अहिरराव (५२, रा. कर्मवीरनगर, साक्री) यांच्या तक्रारीवरून ललित पहाडे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ration of integrated child development to private trader goods worth 83 thousand seized mrj