जळगाव – जामनेर येथे रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाण्यापूर्वीच पुरवठा विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हस्तगत करण्यात आला असून, तांदळासह सुमारे तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जामनेर येथील पोलीस ठाण्यात गोदाममालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चालक आणि तीन मजुरांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना २० डिसेंबरला रात्री नेरी दिगर- जळगाव रस्त्यालगतच्या भोळेनगर परिसरात कांतिलाल जैन यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये रेशनचा तांदूळ साठवून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी मालवाहू मोटारीत तो भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर, जामनेरचे तलाठी नितीन मनोर, डोहरीचे तलाठी अजय गवते, देवळसगावचे तलाठी चेतन ताथे, बेटावद बुद्रुकचे तलाठी अभिलाश ठाकरे, पाळधीचे तलाठी प्रमोद इंगळे, पाटखेडा येथील तलाठी राजेश देवळे व गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना कारवाईच्या सूचना केल्या.

हेही वाचा – नाशिकमध्ये आता घरांच्या किंमतींची पाच कोटींपर्यंत मजल; गुरुवारपासून ‘होमेथॉन २०२३’ प्रदर्शन

दोन खासगी वाहनांतून पथकाने जैन यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. तेथे पाच जण मालवाहू मोटारीत तांदळाच्या गोण्या भरत होते. शेडमध्ये काही प्लास्टिकच्या गोण्याही आढळून आल्या. पथकातील पुरवठा निरीक्षक वैराळकर यांनी उपस्थितांना नाव व पत्ता विचारला. त्यांनी गोदाममालक कांतिलाल जैन (रा. नेरी दिगर, जामनेर), चालक सुकलाल नेमाडे (रा. नेरी बुद्रुक, जामनेर), मजूर श्रीकांत पाटील (रा. माळपिंप्री, जामनेर), मजूर सुभाष रेषवाल (रा. जामनेरपुरा, जामनेर), मजूर महेंद्र वाघ (रा. जामनेरपुरा) अशी माहिती दिली.

कांतिलाल जैन यांनी तांदूळ हा आसपासच्या गावातून शिधापत्रिकाधारकांकडून विकत घेतला असून, तो पुन्हा खुल्या बाजारात विक्री करतो, असे सांगत याबाबतचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून शासकीय मालकीचा रेशनचा तांदूळ बेकायदा साठा करून त्याची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. मालवाहू वाहनात २३ गोण्या, तर ९५ गोण्या शेडमध्ये भरलेल्या आढळून आल्या. प्रत्येक गोणीत ४०-४५ किलो तांदूळ होता. एक लाख ६० हजारांच्या ११८ गोण्या भरलेला तांदूळ, दोन लाखांची मालवाहू मोटार व तांदूळ भरण्यासाठी वापरण्यात येणार्‍या १७६ रिकाम्या गोण्या, असा सुमारे तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तो जामनेर येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

हेही वाचा – जळगाव मनपा तिजोरीत ऑनलाइन करभरणामुळे तीन वर्षांत ३९ कोटी जमा, आता क्यूआर कोड लावणार

पथकाकडून रात्री बारापर्यंत पंचनामा सुरू होता. याप्रकरणी जामनेर येथील पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर (३१, रा. पारिजात कॉलनी, वाकी रोड, जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गोदाममालकासह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ration rice seized before selling it in the black market crime case against five persons in jalgaon district ssb
Show comments