मालेगाव: महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कोकण विभागाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांची पदस्थापना करण्यात आली आहे. जाधव यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला.
अडीच वर्षे गोसावी यांनी आयुक्त म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक लांबल्याने जून २०२२ पासून प्रशासक पदाचा कार्यभारही गोसावी यांच्याकडे होता. नगर विकास विभागाने एक आदेश काढून गोसावी यांची मालेगाव येथून अमरावती महसूल विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त या पदावर बदली केली. गोसावी यांच्या जागेवर आलेले जाधव यांनी १९९३ मध्ये मुख्याधिकारी गट ब म्हणून सेवेस प्रारंभ केला. गेवराई, शिरुर, शेगाव, राहुरी, पंढरपूर, चाळीसगाव या नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे.
हेही वाचा… नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद
धुळे महापालिकेत उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद शाखेत सहआयुक्त म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. जाधव यांनी मालेगावचे आयुक्त व प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त सुहास जगताप, राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरिश डिंबर, शहर अभियंता कैलास बच्छाव आदी उपस्थित होते.