दीपावली म्हटले की, खवय्यांच्या डोळ्यासमोर विविध खाद्यपदार्थानी भरलेले फराळाचे ताट अलगद समोर येते. या ताटाला यंदा वाढलेल्या महागाईची नजर लागली आहे. त्यामुळे अनेकांनी फराळ्याच्या यादीला कात्री लावत तयार मोजकेच खाद्यपदार्थ घरी आणण्यास प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. या शिवाय अनेक कुटुंबांनी आचाऱ्याकडून हे काम करवून घेण्यास प्राधान्य दिल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळी आणि फराळ हे समीकरण ठरलेले आहे. आजही परंपरेने दिवाळीच्या चार दिवसात घरांमध्ये शंकरपाळी, चिवडा, लाडू, करंजी, शेव आणि चकली, अनारसे अशा विविध खाद्यपदार्थानी सजलेल्या ताटाने न्याहारी करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे घरोघरी फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. मात्र दीपावली निमित्त होणारी साफसफाई तसेच इतर कामांमुळे महिला वर्गात फराळाचा उत्साह फारसा राहत नाही. तसेच भाजणी, फराळातील काही प्रमाण कमी जास्त झाले की, खाद्यपदार्थ बिघडण्याचा धोका असतो. त्यात नोकरदार आणि व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या स्थितीत काहींनी फराळ घरी करायचे नियोजन केले असले तरी डाळ, तूप व तत्सम पदार्थाचे वाढलेल्या भावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. फराळासाठी लागणारा सुकामेवा, साखर, खोबरे, मैदा, रवा यासह अन्य किराणा मालाचे दर काही महिन्यांच्या तुलनेत चांगलेच वधारले आहेत. त्यात चकलीच्या भाजणीसाठी आवश्यक डाळींचे भाव पाहता पोहा किंवा कुरमुरे यांच्या मदतीने मोजक्या डाळींचा वापर करत भाजणी तयार करण्यात येत आहे. तयार फराळाचे भाव आणि घरी तयार करण्यासाठी येणारा खर्च जवळपास सारखाच असल्याने गृहिणी तसेच नोकरदार महिलांनी तयार फराळाचा पर्याय स्वीकारला आहे. तयार फराळात तिखट शेव, भाकरवडी, मका चिवडा, लाल शेव, पोहा चिवडा, चंपाकली, सुकी कचोरी, रव्याची करंजी यासह अन्य पर्याय खवय्यांना मिळतात. त्यासाठी प्रति किलो २२५ ते ३०० रुपये, खोबरा करंजीसाठी सर्वाधिक म्हणजे ४०० रुपये प्रति किलो मोजावे लागत आहे.

काहींनी नजरेसमोर तयार केलेल्या फराळाला पसंती दिली आहे. किराणा दुकानदारांनी ही मेख ओळखत दुकानासमोरील मोकळ्या जागेत आचाऱ्यांना मंडप टाकून दिला आहे. दुकानातून किराणा घेतला की, महिला त्याची तिथेच निवड करत आचाऱ्याला प्रती किलो ६० ते ८० रुपये किलो मजुरी देऊन फराळ बनवून घेतात. कामाचा ताण हलका व्हावा आणि दीपोत्सवाचा आनंद लुटता यावा, यासाठी पडणाऱ्या आर्थिक भुर्दडांचा भार अनेकांनी सहज पेलला आहे.