Nashik Vidhan sabha seats : नाशिक : पक्षांतर करून वा अपक्ष मैदानात उतरत बंडखोरीचे निशाण फडकवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. देवळालीत मित्रपक्षांनी अधिकृत उमेदवार देऊनही बंडखोरी केली होती. परंतु, त्यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले.

विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात झालेली बंडखोरी चर्चेचा विषय ठरली होती. ऐनवेळी काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवली. तर काही अपक्ष मैदानात उतरले. देवळाली मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यातील जागेवर शिवसेना शिंदे गटाने डॉ. राजश्री अहिरराव यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना ४० हजार मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. नाशिक पश्चिम मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले दिनकर पाटील हे मनसेच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. ४६६४९ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

हेही वाचा…नाशिकमध्ये कुठे जल्लोष करत झाली गुलालाची उधळण, तर कुठे शुकशुकाट

चांदवड मतदारसंघात भाऊबंदकी उफाळून आली होती. या मतदारसंघात बंडखोरी करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ४७ हजार ३७१ मते मिळाली. नांदगाव मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांनी गाजली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर बंडखोरी केली होती. ४८१९४ मतांनी तेही पराभूत झाले. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नशीब अजमावले. त्यांना सुमारे ७० हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. इगतपुरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर निर्मला गावित यांना २३ हजार मते मिळून त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.