दर्जेदार पिकामुळे कॅनडा, रशिया, मलेशियातून प्रचंड मागणी
अनिकेत साठे, नाशिक
राज्यभरात अनेक भागांत अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांची प्रतिकूल परिस्थिती असताना नाशिकमधील द्राक्ष उत्पादनाला मात्र त्याची फारशी झळ पोहोचली नाही. याचा चांगला परिणाम म्हणजे द्राक्ष उत्पादनात प्रचंड वाढ झाली असून निर्यातीचाही विक्रम नोंदविला गेला आहे.
काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट अशा आपत्तीला तोंड देणाऱ्या द्राक्ष शेतीला यंदा निसर्गाची योग्य साथ लाभली. त्याचा दर्जेदार द्राक्ष उत्पादनास हातभार लागला. यामुळे जिल्ह्य़ात द्राक्ष लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी पूर्वनोंदणी झाली. कॅनडा, रशिया, मलेशियासह अनेक युरोपीय देशांतून द्राक्षाला मागणी वाढल्याचे दिसून आले.
उच्च दर्जाचे पीक मोठय़ा प्रमाणात आल्याने निर्यातीला चालना मिळाली. बागांसमोर फारशी अडचण न आल्याने यंदा विक्रमी निर्यात शक्य झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी सांगितले.
द्राक्ष लागवडीचे नाशिक जिल्ह्य़ात एकूण क्षेत्र ५८ हजार हेक्टर आहे. त्याचा विचार केल्यास निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील द्राक्षांची उत्पादकांनी निर्यातीच्या दृष्टीने जोपासना केल्याचे दिसून येते.
हंगामात दरातील चढ-उतारही पाहण्यास मिळाले. निर्यातक्षम द्राक्षांना हंगामाच्या प्रारंभी प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळालेले दर आवक वाढल्यानंतर मात्र ५० ते ६० पर्यंत खाली आले. उत्पादन खर्च वाढत असला तरी दशकभरापासून हेच दर कायम असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला वाढलेल्या दराचा लाभ काहींना झाला. थंडीमुळे द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास विलंब झाला. नंतर एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात आला. देशात बराच काळ थंडी राहिल्याने मालाला उठाव नव्हता. मागणी नसल्याने दर घसरले. त्याचा प्रभाव निर्यातक्षम द्राक्षांच्या दरावरही झाला. दिंडोरीतील धिरज तिवारी यांची द्राक्षे जर्मनीला गेली. त्यांना किलोला ५० ते ५५ रुपये दर मिळाले. गेल्या वर्षी रशियाला गेलेल्या त्यांच्या द्राक्षांना ७० ते ७५ रुपये दर मिळाला होता. बागकामासाठी मोठय़ा प्रमाणात मजूर लागतात. द्राक्ष फळाला विशिष्ट आकार प्राप्त होण्यासाठी औषध आणि इतर खर्च अधिक असतो. वर्षांगणिक उत्पादन खर्च वाढत असला, तरी अपेक्षित दर मिळत नसल्याचे उत्पादकांनी सांगितले.
हंगाम निहाय निर्यात (मेट्रिक टनमध्ये)
२०१८-१९ : एक लाख ४३ हजार
२०१७-१८ : एक लाख दोन हजार
२०१६-१७ : एक लाख ३२ हजार
झाले काय?
राज्यभर प्रतिकूल परिस्थिती असली तरी नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ६० टक्के क्षेत्रातील पिकाची आधीच निर्यातीसाठी नोंदणी झाली. द्राक्ष निर्यातीच्या इतिहासात या हंगामातली ही सर्वाधिक निर्यात ठरली. तब्बल एक लाख ४३ हजार मेट्रिक टन इतकी विक्रमी द्राक्षे परदेशात गेली. गतवर्षीच्या तुलनेत ४१ हजार मेट्रिक टन अशी विक्रीनोंद यंदा झाली.
नोंदणीतही अधिक्य..
नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी ठिकाणी पाठविण्यात आली. युरोपीय देशांत निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी करावी लागते. त्याकरिता जिल्ह्य़ातील तब्बल ३८ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावरील बागांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी हेच प्रमाण ३० हजार हेक्टर होते.
द्राक्ष निर्यातीचे प्रमाण वाढले, पण शेतकऱ्याला फारसा लाभ झाला नाही. यंदा पोषक हवामान होते. उत्पादनात वाढ झाली. बराच काळ थंडी राहिल्याने देशांतर्गत बाजारात दर घसरलेले होते. यामुळे निर्यातदारांनी मोठय़ा प्रमाणात माल खरेदी करत निर्यातीवर भर दिला. युरोपीय देशांत जवळपास नऊ हजार कंटेनर पाठविण्यात आले. संपूर्ण हंगामाचा विचार करता सरासरी ५० ते ६० रुपये उत्पादकास भाव मिळाला. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन कमी असते, तेव्हा चांगले दर मिळतात. यंदा उत्पादन वाढल्याने हे समीकरण व्यस्त झाले.
– जगन्नाथ खापरे (अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना)