माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात करण्यात आलेली बहुचर्चित नोकरभरती रद्द करण्यात आली असून, ती आवश्यकता नसतानाही करण्यात आल्याचा आरोप करीत दूध संघास महिनाभरात सुमारे ९५ लाखांचा नफा झाल्याचे संघाचे अध्यक्ष तथा भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हा दूध संघाच्या सभागृहात अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अध्यक्ष चव्हाण यांनी शनिवारी दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांसह संघाच्या कामकाजाचा आढावा घेत आर्थिक माहिती घेण्यात आल्याचे सांगत एनडीबीबीचा काळ, मधला सात वर्षांतील काळ आणि आता आमचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरची परिस्थिती याविषयी माहिती दिली. अध्यक्ष चव्हाण यांनी, खडसेंनी फक्त आकड्यांचा खेळ केल्याचा आरोप करीत खडसेंकडून आम्हीच दूध संघ वाचविल्याचे भासविले गेले. मात्र, एनडीडीबीच्या काळातच दूध संघ चांगल्या परिस्थितीत होता. अध्यक्ष चव्हाण यांनी, खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात मोठा घोळ झाला झाला असल्याचा आरोप करीत दूध संघाच्या अहितकारी आणि डोईजड ठरलेली नोकरभरती रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खडसेंच्या काळात दूध संघाला सुमारे नऊ कोटी साठ लाखांचा तोटा होता. आता आम्ही कार्यभार घेताच महिनाभरात ९५ लाखांचा नफा झाला आहे.
हेही वाचा- नंदुरबार जिल्ह्याची साडेपाच कोटींची औषध खरेदी रखडली, तांत्रिक मान्यता मिळूनही विलंब
खडसेंच्या नेतृत्वातील संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत नऊ कोटी ६७ लाखांचा तोटा झाला असून, यात ऑगस्ट २०२२ मध्ये प्रशासकीय मंडळ होते. या काळात २० लाखांचा नफा झाला, तर आता नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाखांचा नफा झाला असून, या महिनाभराच्या काळात संघात होणारा अतिरिक्त खर्चही कमी केला आहे. दूध संघात २०२१ मध्ये नोकरभरती राबवून १०४ कर्मचारी घेण्यात आले. ७७ कर्मचारी काम करीत आहेत. त्यावेळी केलेली नोकरभरती संघाच्या हिताची नव्हती. अतिरिक्त असलेले वीस कामगार कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने नोकरभरती रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला असून, ही नोकरभरती रद्द झाली असल्याची माहिती आम्ही न्यायालयालाही देण्यात येणार आहे. आता दूध संघास नोकरभरतीची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी जांभळ्या स्केच पेनचा वापर करण्याचे निर्देश
दूध संघातील लोणी (बटर) वाई येथील शीतगृहात ठेवले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. हा खर्च नेहमीच वादात होता. त्यामुळे आता हे शीतगृह संघाच्या आवारातच उभारण्यात आले आहे. त्यामुळे चोरी अथवा गैरप्रकार होणार नाही आणि लक्षही राहणार आहे. त्यामुळे दूध संघाचे वर्षाला पंधरा लाख रुपये वाचतील, असेही अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.