लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या ५० टक्के कोट्यातील १३० जागांसाठीची भरती प्रक्रिया एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या वतीने तळागाळात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात येते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे आरोग्य सेवक काम करतात. रुग्णांची तपासणी करणे, त्यांना औषधे देणे, लसीकरण करणे, लसीकरणाच्या नोंदी ठेवणे, अशी अनेक दैनंदिन कामे आरोग्य सेवकाला करावी लागतात. आरोग्य विभागाने आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या ५० टक्के कोट्यातील १३० जागांसाठी पाच ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यास दीड ते पावणेदोन वर्षांचा कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे उमेदवारांमध्ये असंतोष आहे.
न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मुद्यावरुन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. राज्यातील अमरावती, नागपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ या जिल्हा परिषदांनी अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तीपत्रेही दिली आहेत. जळगाव जिल्हा परिषदेने २८ मार्च रोजी कागदपत्रांची तपासणी करुन अंतिम निवड यादी तत्काळ प्रसिद्ध केली. नाशिक जिल्हा परिषद मात्र या कार्यवाहीत मागे राहिली असल्याची उमेदवारांची ओरड आहे.
याविषयी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी आरोग्य सेवक नियुक्तीविषयी कुठलीही दिरंगाई झाली नसल्याचा दावा केला. नियोजित वेळापत्रकापेक्षा काहीशा विलंबाने ही प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्हा परिषदेत १३० आरोग्य सेवकांची भरती करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राथमिक स्तरावर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. लवकरच पहिली प्रारुप यादी जाहीर होईल. यानंतर नियुक्तीच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. एप्रिल अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.