पोलिसांविषयीची भीती दूर होण्यासाठी संकेतस्थळावर * विशेष व्यवस्था; तपासातील प्रगतीही समजणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांविषयीची मनातील भीती दूर व्हावी तसेच एका क्लिकसरशी नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता याव्या यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करण्याची विशेष व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा पोलीस ठाण्यातील फेऱ्या मारण्याचा त्रास वाचणार असून घरबसल्या आपल्या तक्रारीची सद्य:स्थिती काय याबाबतची माहितीही मिळणार आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक संजीवकुमार सिंगल यांनी ही माहिती दिली. नााशिक पोलीस आयुक्तालयात मंगळवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. पोलीस तसेच पोलीस ठाण्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारी भीती-दडपण दूर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘ऑनलाइन तक्रार’ व्यवस्थेची सुविधा उपलब्ध केली आहे. पोलीस दलाच्यावतीने ‘डब्ल्यू.डब्ल्यू.एमएचपोलीस.महाराष्ट्र.गव्ह.इन’ या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

संकेतस्थळावर नागरिकांची सनद असून त्यात राज्यातील विविध जिल्ह्य़ातील गुन्हे, हरविलेल्या व्यक्ती, फरार व वेगवेगळ्या गुन्ह्य़ात अटक झालेल्या व्यक्ती, विविध पोलीस ठाण्यातील अनोळखी मृतदेह, पोलीस ठाण्यातील तक्रारी आदींची माहिती पाहता येणार आहे. मात्र त्यात महिलांवरील अत्याचार, मोक्का, टाडा यांसह संवेदनशील गुन्ह्य़ांचा, दोन समाज घटकांत तेढ वाढविणाऱ्या घटनांची माहिती देण्यात येणार नाही. संकेतस्थळाचा वापर करत नोंदणी न करता नागरिकांना तक्रार, अटक संशयिताची माहिती, अनोळखी मृतदेह माहिती, हरविलेल्या व्यक्ती, गहाळ भ्रमणध्वनीची तक्रार देता येईल. तसेच संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाने नोंदणी करून नागरिक ई-तक्रार करू शकतात. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तत्सम उपक्रमांसाठी आवश्यक परवानगीचा अर्ज सादर करता येईल. चारित्र्य प्रमाणपत्र, वाहन चौकशी यासह १३ सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, हरविलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना घरबसल्या संगणकावर किंवा भ्रमणध्वनीवर राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील माहिती मिळाल्याने त्यांचा वेळ वाचेल तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत फेऱ्या मारण्याचे काम कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आवश्यकता भासल्यासच तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

तक्रारीनंतर तपासाचा तपशीलही ई-तक्रार नोंदविल्यानंतर तक्रारदाराला तसा लघुसंदेश प्राप्त

होईल. यानंतर तो गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्याकडे वर्ग झाला, त्यावर कोण चौकशी अधिकारी काम पाहात आहे याचा तपशीलही त्याला कळविला जाईल. मात्र यापैकी कुठल्या तक्रारींची नोंद करायची अथवा नाही याचा अधिकार त्या त्या पोलीस ठाण्याला आहे. याबाबत तांत्रिक प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह उपायुक्त उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Register fir online at website of maharashtra state police