मालेगाव :नाशिक येथील क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापत्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिता पाटील (१८) या विद्यार्थिनीने संस्थेच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वसतिगृह प्रमुख आणि संस्था प्रशासनाविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्मिता ही सटाणा येथील रहिवासी होती. गणेशोत्सवानिमित्त सुट्टी असल्याने काही दिवस ती घरी गेली होती. गुरुवारी ती वसतिगृहात परतली. अन्य सहकारी विद्यार्थिनी गावी गेल्या असल्याने खोलीत ती एकटीच होती. अस्मिता रात्री भोजनासाठी आली नाही तसेच सकाळी चहा-नाश्त्यासाठीही न आल्याने मैत्रिणीने खोलीचा दरवाजा वाजवून तिला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आतून प्रतिसाद मिळू शकला नाही. यानंतर खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. कुटुंबियांनी वसतिगृहाच्या प्रमुख उमा हरक आणि संस्था प्रशासनाने मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट केल्याची तक्रार केली. यावरून हरक आणि संस्थेविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा…नाशिक : बनावट प्रस्तावविषयी सार्वजनिक बांधकामकडे संशयाची सुई ,चौकशी करून कारवाईचे निर्देश देण्याची तयारी

अस्मिता ही सटाणा येथील सधन कुटुंबातील असून अभ्यासात अत्यंत हुशार होती. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ती उचलू शकत नसल्याचा विश्वास नातेवाईकांनी व्यक्त केला. तिचा घातपात करून आत्महत्येचा बनाव केला असण्याची शक्यता असून वसतिगृह प्रशासन काहीतरी लपवत आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हे ही वाचा…नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक,व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी

दरम्यान, या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी सांगितले.