शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सची भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात विचारणा केल्यास ‘फोर जी’चे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. ३१ मे रोजी ते पूर्णत्वास जाणार होते. तथापि, ही तारीख उलटूनही भ्रमणध्वनी सेवा पूर्ववत होत नसल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे. रिलायन्स कंपनीचे शहर व परिसरात हजारो ग्राहक आहेत. कंपनीतर्फे ही सेवा ‘फोर जी’त रुपांतरीत केली जात आहे. या तांत्रिक बदलाचा फटका गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ग्राहकांना बसत आहे. दिवसभर या कंपनीची रेंज अंतर्धान पावत असल्याने ग्राहकांना कोणाशी संपर्क साधणे अवघड बनले आहे. दुसरीकडे कोणी या ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास संपर्क साधत असलेला क्रमांक बंद आहे, कधी संपर्क क्षेत्राबाहेर आहे तर कधी आपण संपर्क साधत असलेला क्रमांक ‘स्वीच ऑफ’ आहे, अशी अफलातून उत्तरे दिली जात असल्याने संपर्क साधणाऱ्यांबरोबर ग्राहकही त्रस्तावले आहेत. संपूर्ण दिवसात रात्री कधीतरी काही मिनिटांसाठी भ्रमणध्वनीला रेंज येते आणि लागलीच गायब होते. या संदर्भात ग्राहकांनी कंपनीशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे न देता मध्येच फोन कट केला जात असल्याची तक्रारही ग्राहकांनी केली. रिलायन्सची सेवा विस्कळीत झाल्याचा विपरित परिणाम अनेकांच्या दैनंदिन बँकिंग व्यवहारासह औषधोपचार वा अन्य महत्वपूर्ण बाबींवर झाल्याचे ग्राहकांनी सांगितले. काही ग्राहकांनी कंपनीच्या दालनात प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली असता ३१ मे रोजी सेवा पूर्ववत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, ही घटीका उलटून गेल्यानंतरही बुधवारी भ्रमणध्वनी सेवा पूर्णपणे विस्कळीत राहिल्याची तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा