माहितीची कोणतीच व्यवस्था नसल्याने भाविकांमध्ये नाराजी
शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकीकडे घोषणांचे गोडवे गायले जात असताना देशाच्या इतर भागातून जे भाविक, पर्यटक शहरात येतात, त्यांना योग्य माहिती मिळावी तसेच त्यांच्यापर्यंत नाशिकचे योग्य आदरातिथ्य पोहचावे, याची कोणतीच व्यवस्था महापालिका प्रशासन किंवा इतर संस्थांच्या वतीने होत नसल्याने परराज्यातील भाविकांमध्ये असलेल्या नाराजीचे दर्शन सोमवारी झाले.
धार्मिकदृष्टय़ा मकरसंक्रातीला असणारे महत्त्व लक्षात घेऊन लागोपाठ आलेल्या सुट्टय़ांचा फायदा घेत नाशिकसह त्र्यंबकेश्वर, वणी येथे तीर्थक्षेत्र ठिकाणी स्नानासाठी तसेच देव दर्शनासाठी सोमवारपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. देशभरातून आलेल्या भाविकांमुळे सोमवारी रामकुंड परिसरासह पंचवटीतील अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्नानासाठी बाहेरगावहून आलेल्या भाविकांनी गोदाकाठची स्थिती पाहून नाराजी व्यक्त केली.
नव्या वर्षांची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात व्हावी हा प्रत्येकाचा संकल्प असतो. यासाठी पर्यटनासह, पूजेला अनेकांची विशेष पसंती असते. मकरसक्रांतीच्या पूर्वदिनी म्हणजे भोगी तसेच मकरसंक्रातीला तीर्थक्षेत्री स्नान करण्याला धार्मिकदृष्टया विशेष महत्त्व असल्याने शहर परिसरातील गोदाकाठ, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त परिसरात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. उत्तर भारत, गुजरातसह देशाच्या अन्य भागांतून मोठय़ा संख्येने परप्रांतीय भाविक विविध वाहनांनी शहर परिसरात दाखल झाले. सोमवारी पहाटेपासूनच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या खासगी वाहनांची दहीपूल परिसर, गणेशवाडीतील आयुर्वेदिक दवाखाना परिसरात गर्दी झाली होती. रामकुंड परिसरात स्नान, पूजा झाल्यानंतर भाविक कपालेश्वर, काळाराम मंदिर, गोराराम मंदिरासह गोदाकाठावरील अन्य काही मंदिर, मठ परिसराला भेट देत त्र्यंबक, वणी, शिर्डीकडे मार्गस्थ होत आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने भाविक नाशिकला येत असतानाही त्यांच्या माहितीसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुविधा केलेली नसल्याचा फटका भाविकांना बसत होता.
उत्तर प्रदेशातील अशोक सिंग यांनी गोदावरीच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. पाण्याला दरुगधी येत असून भाविक या ठिकाणी स्नान करीत कपडे त्याच ठिकाणी टाकून देतात, तर काही जण इथेच कपडे धूत आहेत. निर्माल्यही या ठिकाणी कुजत आहे. नदीचे पाणी वाहते राहावे, अशी अपेक्षा सिंग यांनी व्यक्त केली.
गर्दीची संधी साधून गोदाकाठावर प्रसाद, पूजेच्या साहित्यांसह खाद्य पदार्थाची लहान-मोठी दुकाने लागली होती. त्र्यंबकेश्वर येथेही सोमवार असल्यामुळे भाविकांनी कुशावर्त स्नानानंतर त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी केली. खासगी वाहने मोठय़ा प्रमाणावर दिवसभर त्र्यंबक शहर परिसरात दाखल होत राहिले. मंदिर परिसरातील सभा मंडपात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सोमवारी या ठिकाणी शृंगेरी मठाचे पीठाधिश्वर विधुशेखर पावती यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट देत अभिषेक आणि कुशावर्तात गंगा पूजन केले.
आम्ही मैत्रिणी भटकंती करण्यासाठी नाशिक येथे आलो असून नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी तसेच शिर्डी या ठिकाणी भेट देऊन मूळ ठिकाणी परतणार आहोत. रामकुंडावर गर्दी असली तरी तिथे माहिती देणारे फलक कुठेच नाहीत. प्रशासनाच्या वतीने परिसरात कोणतीच माहिती दिली जात नसल्याने दिशाभूल होत आहे. – ज्योती तिस्तादे, हैद्राबाद.