नाशिक – गोदावरी नदीच्या प्रवाहात पात्र आणि पूररेषेतील अनधिकृत बांधकामांमुळे अवरोध येत आहे. त्यामुळे नदी किनारी तसेच पूररेषेतील बांधकामे अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. रामकुंड परिसर स्वच्छ ठेवण्याकडे प्राधान्याने लक्ष देतानाच नदीत कपडे व वाहने धुणारे तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची सूचना करण्यात आली.
गोदावरी नदी संवर्धनांविषयी प्रशासक तथा आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. धार्मिक पूजा विधीसाठी संपूर्ण देशातून भाविक रामकुंड येथे येतात. त्यामुळे या परिसराची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. गोदावरीच्या पुलावरून नागरिक निर्माल्य पात्रात टाकतात. त्यासाठी अशा भागात निर्माल्य कलशाची उपलब्धता करण्याची गरज डॉ. करंजकर यांनी मांडली. पात्रात निर्माल्य टाकण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी शहरातील सर्व पुलांवर संरक्षक जाळी बसवावी. अनेकदा आवाहन करूनही गोदा पात्रात कपडे व वाहने धुतली जातात. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे. पूररेषेतील बांधकाम व तसेच नदीकिनारी असलेले अतिक्रमण काढण्याची सूचना त्यांनी केली.
नदीकिनारी बांधकामाचा राडारोडा टाकला जातो. अशा व्यक्तींवर कारवाईसह नदीपात्रातील पानवेली काढण्यास सांगण्यात आले. बैठकीस उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, नितीन नेर , स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अशासकीय सदस्य निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.