लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोदावरीत फोफावलेल्या पानवेलींमुळे काठालगतच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि अनेक समस्या भेडसावत असताना पाटबंधारे विभागाकडून दोन यंत्रांच्या सहाय्याने सायखेडा परिसरात पानवेली काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या यंत्राच्या मदतीने काठालगतच्या मर्यादित भागात पानवेली काढता येतील. मध्यवर्ती पात्रातील पानवेली काढण्यास ते असमर्थ आहे. मूळ प्रश्न सांडपाणी, रसायनयुक्त पाणी गोदापात्रात मिसळण्याचा असून त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे.
शहराच्या खालील भागात गोदापात्रातील पानवेलींमुळे काठावरील १० पेक्षा अधिक गावांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरात सदैव दुर्गंधी असते. काठालगतच्या अर्धा किलोमीटर क्षेत्रात डासांनी थैमान घातले आहे. अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण होते. गोठ्यातील जनावरांनाही जाळीच्या आच्छादनात ठेवावे लागते. पानवेलींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे अलीकडेच संबंधित गावातील सरपंचांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर, गोदा काठालगतच्या भागात दिलासा देण्यासाठी पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाने जेसीबीसारख्या दोन यंत्राच्या माध्यमातून पानवेली काढण्याचे काम सुरू केले आहे.
निफाड तालुक्यातील सायखेडा परिसरात हे काम प्रगतीपथावर आहे. काठावरून हे यंत्र सात ते आठ मीटरपर्यंतच्या पानवेली काढू शकते. नदीकाठावर दोन्ही बाजुने यंत्राचा वापर केला तरी १५ ते १६ मीटरपर्यंतच्या पानवेली निघू शकतात. माडसांगवी ते नांदूरमध्यमेश्वर गावापर्यंत गोदावरी नदीत पानवेली पसरलेल्या आहेत. याचा विचार केल्यास इतक्या मोठ्या प्रमाणातील पानवेली या यंत्राच्या माध्यमातून कशा निघतील. मध्यवर्ती भागातील पानवेली कशा काढणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रक्रिया केंद्रांचे नियोजन केले आहे.
सायखेडा परिसरात दोन यंत्राद्वारे पानवेली काढण्याचे काम होत आहे. गोदावरीचे पात्र कुठे ५० ते कुठे ८० मीटरपर्यंत आहे. यंत्राची तितकी क्षमता नाही. दूषित पाणी पात्रात मिसळत असल्याने नव्याने पानवेलींचा धोका कायम राहील. -अश्पाक शेख (सदस्य, सायखेडा ग्रामपंचायत)