लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथाची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आल्याने श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्री गरुड रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांपासून रथाची डागडुजी करण्यात येत होती. ते काम आता पूर्ण झाले आहे. संस्थानचे विश्वस्त, मंदिराचे पूजाधिकारी आणि व्यायामशाळेचे पदाधिकारी रथाची तांत्रिक चाचणी घेत आहेत.
रथयात्रा जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन, गरुड रथाची सजावट, सुरक्षा व्यवस्था, ब्रेक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रथसेवकांचा गणवेश, स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर विश्वस्त आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. श्री गरुड रथ नूतनीकरणाच्या कामात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आले. रथाच्या लाकडी संरचनेत मजबुतीकरण व कोरीव काम, देवघराचे नूतनीकरण आणि सौंदर्यवर्धन, चाकांची मजबुती वाढवून सुरक्षितता आणि गती सुधारणा, पारंपरिक रचना कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रथाची धुरी हा सर्वात महत्त्वाचा भाग असून गरुड रथाच्या धुरीची संपूर्ण डागडुजी आणि नूतनीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. गंज आणि झिजलेले भाग दुरुस्त करून बदल करण्यात आला असून उच्च प्रतीच्या धातूचा वापर करण्यात आला आहे.
श्रीराम रथ आणि श्री गरुड रथ मिरवणूक हा संस्कृतीचा अभिमानास्पद सोहळा आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. दोन्ही रथ रामकुंड परिसरात आल्यावर देवांना स्नान घातले जाते. त्यासाठी गोदेचे पाणी वाहते तसेच स्वच्छ हवे, ही मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. रामरथावर राजकीय मंडळी चढतात. त्यांनी देवस्थानच्या वतीने सन्मान स्वीकारावा. देव सर्वांचा आहे. त्यांनी रथावरून उतरून सामान्य भाविकांप्रमाणे रथ ओढावा अथवा अन्य सेवा करावी. -धनंजय पुजारी (श्री काळाराम मंदिर देवस्थान, विश्वस्त)
श्री काळाराम संस्थानचा वासंतिक नवरात्रोत्सव
पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीने ३० मार्च ते नऊ एप्रिल या कालावधीत रात्री आठ ते १० या वेळेत मंदिराच्या आवारात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी मीना परूळकर-निकम, प्रियंका कोठावदे यांचा भक्ती रंग, सोमवारी जर्मनीतील पूजा गायतोंडे यांचा भक्तीधारा, मंगळवारी सुरज बारी व अन्य सहकारी यांचा नाशिकचे उगवते सूर, बुधवारी पूजा कुलकर्णी-रोहित जंजाळे यांचा नृत्याविष्कार, पल्लवी पटवर्धन व सहकारी यांचा अवघा रंग एक झाला, गुरूवारी मुंबई येथील अजित कडकडे यांचे गायन, शुक्रवारी पंडित डॉ. अविराज तायडे यांची अभंगवाणी, शनिवारी त्र्यंबकेश्वर येथील श्रृतिका शुक्ल व आसावरी खांडेकर यांचा चैत्रस्वर कार्यक्रम होईल. सोमवारी सायंकाळी सुमुखी अथनी, कीर्ती भवाळकर, आदिती पानसे यांचा राम रंगी रंगले आणि श्रीराम परिक्रमा कार्यक्रम होईल.