नाशिक : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विस्तारात आम्हाला संधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री तथा रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.
सोमवारी आठवले नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा आम्हालाही एक जागा मिळावी. २०१२ पासून भाजपसोबत आहोत. त्यामुळे विस्तारात आम्हाला संधी मिळालीच पाहिजे. कामे होतात म्हणून भाजपसोबत आहे. वास्तविक मंत्रिमंडळात आधीच स्थान मिळावयास हवे होते. मात्र सुरूवातीला मंत्रिमंडळ छोटे असल्याने विस्तारावेळी तुमचा विचार करू, असे सांगण्यात आले. त्याला आता वर्ष उलटले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. आमच्यासोबत आता अजित पवारही आल्याने ताकद वाढली आहे. केवळ आता काँग्रेस सोबत येणे बाकी असल्याचे आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य…
शरद पवार यांच्याविषयी आदर आहेच पण, अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत आम्हाला दोन जागा हव्या आहेत. आपण स्वत: शिर्डीतून लढण्यासाठी इच्छुक आहोत, असेही आठवले यांनी नमूद केले. राज्यात वेगवेगळे गट एकत्र येत असतांना प्रकाश आंबेडकर आणि आपला गट एकत्र आला तर फरक पडेल. परंतु, प्रकाश आंबेडकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. या कायद्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.
आढावा बैठकीत मार्गदर्शन
सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे आढावा बैठकीत केली. केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण ८५ टक्के लोकसंख्या ही सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने ग्रामीण भागात या केंद्रीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्याला मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन या योजनेबाबत समाजात माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. ही योजना समाजाला एकत्र आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही आठवले यांनी यावेळी नमूद केले. बैठकीत आठवले यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.