लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शेतीकामे करण्यास मजूर मिळत नाही. काही ठिकाणी जास्तीचे पैसे देऊनही आहे त्या शेतातून मजूर पळविण्याचे प्रकार घडताना दिसून येतात. शेतीकामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणीही करावी लागते. आता यावर उपाय म्हणून येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीकामांसाठी यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. हा यंत्रमानव शेतीकामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करु शकतो, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.
येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील, दुर्गेश तायडे आणि प्रतिभा पाटील या विद्यार्थ्यांनी शेतीकामे करणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. यंत्रमानवाच्या निर्मितीसाठी अवघा दोन हजार रुपये खर्च आला आहे. या विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षे संशोधन करून पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव, पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणते अन्नद्रव्य, खतांची गरज आहे, याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले. त्यानंतर त्यांनी चारचाकी स्वयंचलित यंत्रमानव तयार केला.
हेही वाचा… नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक
यंत्रमानवात अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑर्डिनो बोर्ड, जंप वायर, बॅटरी, जीपीएस कंट्रोलर, वॅाटर कंट्रोलर, नऊ व्हॅटची बॅटरी, मायक्रो कंट्रोलर आदी बसविण्यात आले आहे. हा यंत्रमानव जीपीएस सिग्नलद्वारे बियाणांची तपासणी करून त्याची माहिती ठेवेल. तो सौरऊर्जेवर काम करणारा आहे. पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकाला आवश्यक असणाऱ्या खताच्या मात्रा याची माहिती देईल. हा चारचाकी स्वयंचलित यंत्रमानव पिकात फिरून पाहणी करतो. एरंडोल तालुक्यात शेतकऱ्यांना या यंत्रमानवाचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.