नाशिक : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पिछेहाट, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर आणि आगामी महापालिका निवडणूक ही आव्हाने पेलण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पडझडीच्या काळात एकनिष्ठ राहिलेल्या सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर उपजिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. सिडकोतील दोन्ही नेत्यांकडे ठाकरे गटाची प्रमुख पदे एकवटली गेली आहेत.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. त्यानंतर पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा विषय समोर आला होता. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची स्पष्टता केली होती. शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) ठाकरे गटाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न कायम होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यास आणखी जोर येईल, हे लक्षात घेता पक्षाने साधारणत: ३- दशकांपासून कार्यऱत डी. जी. सूर्यवंशी यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली. माजी आमदार वसंत गिते आणि माजी महापौर विनायक पांडे असे दावेदार असताना सूर्यवंशींना संधी देण्यात आली. सूर्यवंशी हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

बडगुजर यांचे महत्व कायम

शिवसेना दुभंगल्यापासून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर राहिलेल्या सुधाकर बडगुजर यांना उपनेतेपदी बढती देण्यात आली. बबन घोलप यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. बडगुजर हे खासदार राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वर्षभरात त्यांना दुसऱ्यांदा बढती मिळाली. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते महानगरप्रमुख होते. नंतर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बडगुजर हे शिंदे गटाचे मुख्य लक्ष्य ठरले होते. विविध प्रकरणात त्यांच्यासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Story img Loader