सिडकोतील पाटीलनगर, सावतानगर परिसरात सहा महिन्यांपासून नगरसेवक निधीतून रस्ता रुंदीकरणातंर्गत खोदकाम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यालगत घरे असणारे रहिवासी, व्यावसायिक वेठीस धरले गेले आहेत. पावसाळ्यात महापालिकेकडून खोदकामाला बंदी घालण्यात आली असतानाही खोदकाम करुन रस्तालगत असलेले ओटे काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शिर्डीत होतो, त्यामुळे कोल्हापुरात पाणी पातळी नियंत्रणात; दीपक केसरकर यांचा अजब दावा

पवननगर, सावतानगर, पाटीलनगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मूळ डांबरी रस्ता खोदत रस्त्याच्या उंचीपासून काहीसे खोलगट काम करण्यात येत आहे. हे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. पवननगर ते पाटीलनगर परिसरात हा रस्ता एकसंघ राहिलेला नाही. चौफुली परिसरात हा रस्ता खोदल्यामुळे पर्यायी मार्गाने मार्गस्थ व्हावे लागत आहे. या रस्त्याच्या अंतिम टप्प्यात शनिवारी पाटीलनगर परिसरात दत्त मंदिर ते मनपसंद स्वीट दरम्यान रस्त्यालगत असलेली झाडे, ओटे, जिने काढण्यात आले. यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. भाडेकरु, घरमालक, व्यावसायिक आपआपल्या भागात अघोषित संचारबंदी असल्यासारखे बंदिस्त झाले. वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना जिना काढण्यात आल्याने दुसऱ्या घरातून, गच्चीवरून अन्य जिन्याने ये-जा करावी लागत आहे. तळमजल्यावर असणाऱ्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. आधीच खोदकामामुळे घर ओटा नसल्याने अधिकच उंच वाटू लागले आहे.

हेही वाचा >>> मुक्ताई भवानी अभयारण्यात व्याघ्रसंवर्धनार्थ जनजागृती; वन्यजीव संस्था, वनविभागातर्फे फेरी

याविषयी एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घराचा तळमजला खासगी वित्त संस्थेला भाड्याने दिला आहे. याठिकाणी ग्राहकांची वर्दळ असते. खोदकाम सुरू असल्याने घरातून उतरायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. घरात ज्येष्ठ नागरिक आहेत. मुळात पावसात चिखल, ओट्याखालची जमीन भुसभुशीत झाल्याने ही कसरत झेपणारी नाही. काही अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांची व्यथा वेगळीच. चार महिन्यांहून अधिक काळापासून हे काम सुरू आहे. यामुळे गिऱ्हाईक कसरत करून दुकानात यायला तयार नाही. जे येतात ते किरकोळ सामान घेऊन जातात. यामुळे कित्येक महिने नवा माल भरलेला नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

रस्ता लवकरच पूर्ववत

काँक्रिटीकरणासाठी खोदण्यात आलेला रस्ता लवकरच पूर्ववत होईल. यासाठी पेव्हरब्लॉक टाकण्यात येत आहेत. रस्त्यालगत असलेली झाडे काढण्यासाठी परवानगी घेतली असून खोदकामाची माहिती घेण्यात येईल.

– अभियंता (बांधकाम विभाग)

बंदी असताना खोदकाम

पावसाळ्यात रस्त्यांच्या खोदकामावर खुद्द महापालिकेने बंदी घातलेली असताना पाटीलनगरमध्ये मात्र नव्या रस्त्याच्या कामात थेट जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात आले. लहान-मोठी झाडे हटविली गेली. जी झाडे अद्याप शिल्लक आहेत, त्यांची मुळे उघडी पडली आहेत. खोदकाम करताना रस्त्यालगतच्या घरांचा दरवाजा आणि रस्ता यात चार ते पाच फुटाचे अंतर पडले. काही घरांचा वरच्या मजल्यावर जाणारा जिना यात गेला. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण शहरात रस्ते खोदण्यात बंदी असताना नव्या रस्त्यासाठी विचित्र पध्दतीने झालेल्या खोदकामाने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents facing inconvenience due to excavation for concrete road in cidco in area zws
Show comments