नाशिक – बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण तुडुंब भरून ओसंडून वाहू लागल्याने मोसम खोऱ्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण, तालुक्यातील अनेक लघुप्रकल्पांत समाधानकारक जलसाठा नसल्याने अनेक टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न अद्याप कायम आहे.
बागलाण तालुक्यातील सुमारे ११६६ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हरणबारी हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणावर बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील १२० गावांचे सिंचन आणि पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यंदा मात्र पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्यामुळे तालुक्यापुढे मोठे जलसंकट उभे ठाकले होते. चार दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने हरणबारी धरण तुडुंब भरून सांडव्यामधून सुमारे १५० क्यूसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना पूर्ववत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – नाशिक खड्डेमय; वाहतूक कोंडीसह अपघातास आमंत्रण, वाहनांचे नुकसान
केळझर धरणासह ६९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला दसाना आणि ५९ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेला पठावा लघु प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे हत्ती आणि कान्हेरी आरम नदी परिसर, सटाणा शहरासह मुंजवाड, केरसाने, वटार, विंचुरे, जोरण, किकवारी, तळवाडे दिगर, मोरकुरे, विरगाव, डोंगरेज, तरसाळी, वनोली, औंदाणे, केरसाने या टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न कायम आहे. तर करंजाडी नदीवर बांधलेला जाखोड लघुप्रकल्प मात्र ४८ टक्केच भरल्याने करंजाडी खोऱ्यातील गळवाडे, करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर या गावांमध्ये टंचाईचे सावट कायम आहे.
हेही वाचा – गोदावरीच्या पूररेषेतील अतिक्रमण हटवा; मनपा आयुक्तांचे निर्देश
शेमळी, तळवाडे भामेर, रातीर, कऱ्हे, दोधेश्वर, सुकेड हे लघुप्रकल्प अद्यापही कोरडेच असल्यामुळे शेमळी, आराई, अजमिर सौंदाणे, कऱ्हेगाव, चौगाव, भाक्षी, मुळाणे, रातीर, तळवाडे भामेर, टेंभे, इजमाने या भागात जलसंकट कायम असून अद्याप या भागातील नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.