नाशिक: सिडकोतील सावता नगरात शुक्रवारी पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. वन विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
सावता नगरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सावतानगरातील विठ्ठल मंदिर, जीएसटी कार्यालय, मिलिटरी हेडक्वार्टर, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला आहे. बिबट्याला वन विभागाने जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. आसाम दौऱ्यावार असणारे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत बिबट्याचा अटकाव करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा… शासकीय योजनांचा गावोगावी जागर; विकसित भारत संकल्प रथयात्रेला जिल्ह्यात हिरवा झेंडा
दरम्यान, आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत शिरल्याने रहिवाशी धास्तावले आहेत. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.