नाशिक : धर्माविषयी अधिकार नसताना वक्तव्य करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना प्रतिबंधित करण्यासाठी कायदा करावा, संपूर्ण देशात गोहत्या बंदी कायदा लागू करावा, यांसह इतर मागण्यांचे ठराव येथे अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत करण्यात आले.
शनिवारी पंचवटीतील जनार्दन स्वामी मठात संत समितीची बैठक दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदासशास्त्री महाराज, महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, संत समितीचे प्रदेश प्रमुख महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, महंत सुधीरदास पुजारी, आखाडा परिषदेचे भक्तीचरण दास महाराज आदींच्या उपस्थितीत झाली.
धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. राजकीय नेत्यांच्या विधानांमुळे संभ्रम निर्माण होतो. भावना दुखावल्या जातात. जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरे यांचे दाखले देत अशी विधाने करणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आल्याचे महंत अनिकेतशास्त्री यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याआधी गोदावरी आणइ तिच्या उपनद्यांचे शुध्दीकरण होणे आवश्यक आहे. कुंभमेळा नियोजनात, प्राधिकरणात धर्माचार्य आणि तीर्थ पुरोहितांना स्थान देण्याचा मुद्दा मांडला गेला. देशातील ८० टक्के नागरिकांची गोहत्या बंदी व्हावी अशी इच्छा असल्याने केंद्र सरकारने देशात गोहत्या बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला. त्र्यंबकेश्वरप्रमाणे नाशिकलाही अ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी महंत सुधीरदास यांनी केली.