लोकसत्ता वार्ताहर
धुळे: साक्री येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला परिषदेत आदिवासी विरोधी वन कायदा रद्द करावा, वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे आणि वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास त्याची भरपाई मिळावी यांसह अन्य ठराव मांडण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षपदी निलाबाई वळवी या होत्या. उद्घाटन साजूबाई गावित यांनी केले. साजुबाई यांच्यासह परिषदेत कॉम्रेड मेधा थत्ते, प्रतिभा परदेशी, लालाबाई भोये, होमाबाई गावित, लिलाबाई अहिरे ,पवित्राबाई सोनवणे, शांताबाई गावित, जमुनाबाई ठाकरे, स्मिता आंबरे ,लिलाबाई मोरे यांची प्रमुख भाषणे झाली. परिषदेत काही ठराव करण्यात आले. त्यात स्त्री-पुरुष समानतेसाठी विशेष कायदा करा, गरोदर स्त्रिया, बालकांचे कुपोषण थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसंबंधी विशेष व्यवस्था करावी, सरकारी दवाखाने अद्ययावत करावे, आदिवासी विरोधी वन कायदा रद्द करावा, वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे, वन्य प्राण्यांनी शेत पिकांचे नुकसान केल्यास त्याची भरपाई मिळावी, महिलांच्या नावाने शेती करा.
हेही वाचा… दरोडेखोरास ठार मारल्याच्या आरोपातून शेतकरी कुटुंबियांची मुक्तता
शेती सिंचन सुविधा वाढवा, अखंडित व स्वस्त दरात वीज द्यावी, डाकीण प्रथा बंद करण्याच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा आदी ठराव मंजूर करण्यात आले. हे ठराव कल्पना गावित, सुशीला गावित, आशा गावित, शितल गावित, मयुरी गावित, ललिता गावित, मरिया गावित, सविता गावित, लिलाबाई मोरे ,रंगुबाई मावची यांनी मांडले. सभागृहाने एकमताने मंजूर केले. साक्री येथील बाल आनंद नगरीत झालेल्या अधिवेशनाला साक्री, धुळे, नवापूर, नंदुरबार, कन्नड, सटाणा इत्यादी तालुक्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या.