नाशिक – राष्ट्रीय युवा महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून पंचवटीतील हनुमान नगरातील युवाग्राममध्ये आयोजित खाद्य महोत्सवाकडे नाशिककरांची पाऊले वळत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी एकाच छताखाली मिळत असल्याने खाद्य महोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन झाल्यानंतर महोत्सवातील वेगवेगळ्या कार्यक्रमांकडे नाशिककर वळू लागले आहेत. हनुमान नगर परिसरात खाद्य महोत्सव भरवला आहे. महोत्सवात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात यांसह वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील केळी वेफर्स, वडापाव, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ यासह चमचमीत, तर्रीदार कोल्हापुरी उसळसह दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदुवडा, कर्नाटकी गुळपोळी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ नाशिककरांना आकर्षित करत आहेत. तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने देशपातळीवर तृणधान्यविषयक पाककला स्पर्धेतील विजेत्यांच्या पाककृती, पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.