‘जागर आदिशक्तीचा’ चर्चासत्रातील सूर
नवीन पिढी संस्कारक्षम घडविण्याची जबाबदारी आई, वडील, शाळांबरोबर कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, शाळा आणि समाज अशा सर्वाची आहे. संस्कार हे केवळ मार्गदर्शनातून नव्हे, तर आचरणातून घडतात. मुले मोठय़ा माणसांचे अनुकरण करतात. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक चांगले वागण्याचा प्रयत्न करायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
नाशिक शहर पोलिसांच्या वतीने आयोजित ‘जागर आदिशक्तीचा’ उपक्रमांतर्गत ‘सृजनशील पालकत्व आणि आई-मुलीचा संवाद’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन झाले.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत नवरात्रीनिमित्त वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित कार्यक्रमात महिला-बाल कल्याण विभागाच्या सचिव डॉ. विनिता सिंगल, त्यांची कन्या रोहिजा सिंगल, डॉ. आशालता देवळीकर, त्यांची कन्या स्वराली देवळीकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, त्यांची कन्या दामिनी मणेरीकर यांच्यासह पोलीस विभागात समाजसेविका म्हणून काम करणाऱ्या रोहिणी दराडे, उपायुक्त माधुरी कांगणे आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका मेघा बुरकुले यांनी सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी विविध विषयांवर चर्चा केली. याबाबतची माहिती विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी दिली.
जन्मापासून १२ ते १३ वयापर्यंत मुलांचा सांभाळ करताना त्यांना पालकांचा सहवास मिळेल याची काळजी घ्यायला हवी. त्यांना व्यायाम, वाचन, संगीत, कला यांची आवड निर्माण करणे, व्याख्यानांना घेऊन जाणे, विविध विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणे अशा अनेक गोष्टी पालक करू शकतात.
पौगंडावस्थेत मानसिक, वैचारिक बदल व्हायला लागतात. मुलींमध्ये संप्रेरकीय बदल व्हायला सुरुवात होते. शरीरात होणारे बदल समजून घेण्याइतके मन परिपक्व नसते. मग त्यांची चिडचिड वाढते. या वयात स्वत्वाची जाणीव, अहंकार, आकर्षण अशा वेगवेगळ्या भावना वाढायला लागतात. मुलांमध्ये हे थोडसे उशिरा सुरू होते. अचानक शरीराची वाढ वेगाने होते. मनमोकळेपणे त्यांना कोणाशी त्या गोष्टी किंवा स्वत:ला झालेला संभ्रम सांगता येत नाही.
या काळात पालकांनी त्यांच्याशी सुसंवाद न साधल्यास अशा वयात मुले बाहेरचे मित्र शोधायला लागतात. वाईट संगतीमुळे कधी कधी गंभीर समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी लहानपणापासून किशोरवयीन अवस्थेपर्यंत काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक असते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
‘मुलांमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करा’
समाजमाध्यमांचा तरुणाईकडून मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. या माध्यमाला बळी पडून सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत आहे. इंटरनेटचा वापर हा मोठय़ा व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली व्हावा आणि मुलांना इतर गोष्टी जशा खेळ, कला, अभ्यास यामध्ये रुची आणि महत्त्वाकांक्षा निर्माण केल्यास मुले स्वत:च्या कामामध्ये व्यस्त होतील, असा मुद्दा उपस्थितांकडून मांडला गेल्याचे मणेरीकर यांनी सांगितले.