नाशिक : शहरातील काठे गल्ली येथील धार्मिक स्थळासभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन विभागाने अलीकडेच कारवाई केली, त्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारे महसूल प्रशासनाने अनावधानाने प्रमाणित केलेली नोंद अखेर रद्द केली आहे. या संदर्भात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मनपाला कुठलीही सूचना न देता वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यात आल्याची तक्रार केली होती. वक्फ बोर्डाचा बडगा दाखवून अतिक्रमणे केली जातात, असा आरोपही त्यांनी केला होता.

काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गट क्रमांक ४८०/३अ/३ब/६ येथे महापालिकेच्या एकूण क्षेत्र १५५१.९० चौरस मीटरपैकी खुल्या जागेव्यतिरिक्त २५७.३६ चौरस मीटर उर्वरित क्षेत्र आहे. या संदर्भात महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाकडे खटला सुरू आहे. असे असताना न्यायाधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद शेख यांनी २५७.३६ चौरस मीटर उर्वरित क्षेत्राला सातपीर सय्यद बाबा दर्गा नाव लावण्याचे पत्र दिले होते. या पत्राची शहानिशा न करता तहसीलदार कुळकायदा व तहसीलदारांनी १४ नोव्हेंबर २०२४ अन्वये फेरफार नोंद घेतली. नोंद मंजूर करताना सात बारा उताऱ्याच्या इतर हक्कात कोणताही दावा असल्याचा शेरा नमूद नव्हता. ही मिळकत वक्फ मंडळाची असल्याबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा पुरावे सादर केलेले नाहीत.

त्यामुळे ही नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून अनावधानाने मंजूर करण्यात आल्याचे सांगत महसूल यंत्रणेने ती रद्द करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यावर उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी निर्णय घेत सर्वे क्रमांक ४८०/३अ/३ब/६ वरील ती फेरफार नोंद रद्द केली आहे.

Story img Loader