लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: पिंप्राळा उपनगरातील गणपतीनगर भागात खड्ड्यामुळे रिक्षाचा अपघात झाला. त्यात रिक्षातील तरुण गंभीर जखमी झाला. खड्ड्यांमुळे असे अपघात वारंवार होत असल्याने संतप्त रहिवाशांनी आक्रमक होत एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. उपमहापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात एकीकडे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, तर दुसरीकडे विविध कारणांस्तव रस्ते खोदकाम सुरू आहे. शहरातून पिंप्राळा उपनगराकडे येणारा रस्ता खोदून दोन महिने होऊनही काम सुरू झालेले नाही. उपनगरातील उपमहापौरांचा प्रभाग वगळता ऐंशी ते शंभरावर कॉलन्यांसह नगर भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
आणखी वाचा-मालेगाव: चार दिवसाआड पाणी देण्याच्या हमीनंतर आंदोलन स्थगित
गणपतीनगर भागातील नाल्यावरून मुख्य रस्त्यात खड्डे पडले आहेत. याच रस्त्यातील खड्ड्यातून कसरतीने मार्ग काढत असताना धावत्या रिक्षाचा एक्सल तुटला. यात अपघात होऊन तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी आक्रमक होत रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे अधिकारी मनोज वडनेरे, नगरसेविका शोभा बारी, अतुल बारी, नगरसेविकापुत्र आसिफ शेख आदींनी आंदोलनस्थळी धाव घेतली. या रस्त्याचे डांबरीकरण होणार असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डांबरीकरणाचे काम रखडले आहे. पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने करण्यात येईल, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले.