लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहर परिसरात हत्यांचे सत्र सुरू असून सातपूर परिसरात भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या ४२ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालक असलेले प्रकाश सूर्यवंशी (४२, रा. श्रमिक नगर हे जेवण करून शतपावलीसाठी घराबाहेर गेले असता त्यांच्या इमारतीत राहणारे गणेश पाटील यांच्यासह ते रिक्षात गप्पा मारत होते. त्यावेळी संशयित संघर्ष मोरे, प्रेम जाधव, प्रमोद भगत आणि त्यांच्या बरोबर असलेला अजून एक जण असे सर्व तेथे आले. त्यांनी प्रकाश आणि गणेश यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. प्रकाश यांना संशयितांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
कोयते, फायटरने मारहाण केली. गणेश पाटील हा जीव वाचविण्यासाठी पळाला. मारहाणीत प्रकाश सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत ते घरी आले. त्यांच्या पत्नीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशचा बालपणीच्या मित्राशी वाद झाला होता. त्या वादातून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, गणेश तेथून निसटल्याने. प्रकाश यांना मारहाण करण्यात आली. गुन्हेगारांना ताब्यात द्या, या मागणीसाठी सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे परिसरात ठिय्या दिल्याचे सातपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले.