नाशिक – निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद केली जाणार नसल्याचा ठराव केल्यानंतर त्यास राईट टु लव्ह संघटनेने आक्षेप घेतला आहे. ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास संघटनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे. या ठरावाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राईट टु लव्ह संघटनेने आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा >>> काँग्रेस नेते राहुल हे गांधी नसून खान, शरद पोंक्षे यांचा खळबळजनक दावा
सर्वोच्च न्यायालयाने प्रेम करणे, जोडीदार निवडणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचे मान्य केले आहे. तसेच आपल्याकडील विवाह संदर्भातील कायद्यांमध्ये प्रेमविवाहाविषयी कोणतीही वेगळी तरतूद नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रेमविवाहाविषयी केलेला ठराव हा बेकायदेशीर, असंविधानिक असून राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर हा ठराव गदा आणणारा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना असे बेकायदेशीर ठराव करणे म्हणजे स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यासारखे आहे. हा ठराव तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सायखेडा ग्रामपंचायतीने पालकांच्या सहमतीशिवाय गावातील मुलामुलींना प्रेम विवाह करता येणार नाही, असा ठराव केला आहे. हा ठराव भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकांला दिलेल्या मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे तातडीने रद्द करावा अन्यथा न्यायालयात याविषयी दाद मागण्यात येईल. याबाबत सरपंच, पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना राईट टु लव्हच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. – ॲड. विकास शिंदे (राईट टू लव्ह, संस्था)