नाशिक – नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शहरात झालेल्या कार्यक्रमात युवकांनी हुल्लडबाजी करीत गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण करण्यात आली. हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्यावतीने ठक्कर डोम येथे मंगळवारी रात्री गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभागृहात एका बाजूला काही मद्यपी युवक गोंधळ घालत होते. याचे चित्रण माध्यम प्रतिनिधींनी केले. त्याचा राग येऊन काही युवकांनी आकाश येवले व अशोक गवळी यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली.
गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी काठीचा प्रसाद दिला. जखमी येवले व गवळी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गौतमी पाटील यांचे कार्यक्रम व गोंधळ हे समीकरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी निफाडमधील कार्यक्रमात खुर्च्या फेकून युवकांनी गोंधळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्येही झाली.