मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टिका केलीय. राऊत यांनी राज ठाकरेंना, ‘नवहिंदू ओवैसी’ आणि मनसेला ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ म्हटलं आहे.

राऊत यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याचा विषयावरुन राजकीय वातावरण तापवण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केलाय. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीचा हवाला देत राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करुन हिंसा घडवून आणण्याचा आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारऐवजी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इरादा असल्याचा दावा केलाय. राज ठाकरेंनी १२ तारखेला घेतलेल्या ठाण्यातील सभेमध्ये राज्य सरकारला ३ मे म्हणजेच ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिलं आहे. तोपर्यंत भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजामध्ये भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवली जाईल असं राज यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दादरमध्ये हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती पार पडली. खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये राज यांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रमही झाला.

“मशिदींवरील भोंग काढण्याची आणि हनुमान चालीस पाठण करण्याची मागणी ही राज्यामध्ये सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून हे प्रयत्न महाविकास आघाडी सरकार उलथून लावण्यासाठी केले जात आहे. भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने हे प्रयत्न करत आहेत,” असा आरोप राऊत यांनी केलाय. भाजपा सध्या निराश झालेला पक्ष असून महाविकासआघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आपल्या बाजूने करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत असून लोकही त्यांना नाकारात असल्याने त्यांना निराशा आलीय. म्हणूनच ते आजा सामजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. ते नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये आज बोलत होते.

“भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत आहे. भोंगे वाटप करुन मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिलं आहे. ते मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवतील. मग खरे ओवैसी (असदुद्दीन ओवैसी) या प्रकरणामध्ये (भोंगा प्रकरणात) पडतील आणि साऱ्याचं रुपांतर दंगलींमध्ये होईल,” अशी भीती राऊत यांनी व्यक्त केलीय.

“दंगली झाल्यानंतर ते केंद्राकडे राजभवनाच्या माध्यमातून अहवाल पाठवतील आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील. आमच्याकडे यासंदर्भात गुप्त माहिती आणि या योजनेसंदर्भातील तपशील आहे. राज्याचे गृहमंत्रालय या प्रकरणाबद्दल तपास करतंय,” असं राऊत यांनी म्हटलंय.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे अयोध्येला भेट देणार असल्याची घोषणाही राऊत यांनी कार्यकर्त्यासंमोर बोलताना व्यक्त केली. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आदित्य अयोध्येला भेट देणार असल्याचं ते म्हणाले. “नाशिक शिवसेनेकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रामराज्य या संकल्पनेला अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमचं आयोजन केलं जाईल,” असंही राऊत कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले.

Story img Loader