नाशिक : जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही वणव्यांचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार लागणारे वणवे पर्यावरण, जैव विविधतेला धोकादायक असतानाही ते रोखण्यासाठी वन, पर्यावरण खात्याकडून संरक्षण, वणवाप्रवण क्षेत्रात जाळपट्टे उभारणी, नुकसानीचे परीक्षण, वणवा लावणाऱ्यांचा शोध, या उपायांकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र मानवी दुष्कृत्यांमुळे वणव्याच्या कचाट्यात सापडल्याकडे वनप्रेमींनी लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराजवळील रामशेज किल्ल्यास यावर्षी चारवेळा वणवा लागला. रोहिला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर, घुमोडी, गणेशगाव तसेच त्र्यंबकेश्वर शेजारील पहिने वनक्षेत्र, खोरीपाडा वनक्षेत्र, वाघेरा-हरसूल घाट अशा ठिकाणी वणवे लागणे कायमचे झाले आहे. वणव्यांमुळे केवळ झाडेझुडपे, गवत नष्ट होत नसून वन्यजीव, पक्षी विस्थापित होत आहेत. दुर्मिळ झाडी, रोपे, नैसर्गिक बीज, जैवविविधता यांचे अतोनात नुकसान होत आहे. वणवे रोखण्यासाठी वनप्रेमींकडून व्यापक प्रयत्न करण्यात आले. वन, पर्यावरण खात्याने पर्यावरण संस्था, वनसमित्या यांना एकत्र आणून वनसंरक्षण, लाकूड तस्करांना रोखणे, कुऱ्हाडबंदी, जाळपट्टे उभारणी आदी उपाययोजनांसाठी प्रयत्न करावे ,अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक, दरिमाता पर्यावरणमित्र, साहित्यिक पर्यावरण मित्र देवचंद महाले तसेच समविचारी पर्यावरण मित्र यांसह विविध संस्थांनी केली आहे.

हेही वाचा…शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू ; नाशिक जिल्ह्यातील घटना

वणवा हा निसर्गावर आलेले भयंकर संकट आहे, याबाबत अजूनही शासन, प्रशासन तसेच समाज गंभीर नाही. उरल्यासुरलेले डोंगर, टेकड्या, घाटातील जैवविविधता वन्यजीव, पक्षी, दुर्मिळ झाडे, कुऱ्हाडीच्या आणि वणव्यांच्या हवाली असल्याचे चित्र दिसत आहे. हे थांबविण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे ज्येष्ठ निसर्ग साहित्यिक देवचंद महाले यांनी सांगितले.

मातोरी गायरानातील वणवा थेट दऱ्यादेवी पर्यावरण क्षेत्रापर्यंत धडकतो, आम्ही पर्यावरण मित्र, सहकारी शेतकरी, राह फाउंडेशनचे कार्यकर्ते, गवळवाडीचे गावकरी वणवा विझवण्यासाठी येतो. मात्र हे सत्र थांबले पाहिजे. दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे आम्ही लावलेली, जीवापाड जगवलेली भारतीय झाडे वाचवणार कशी ? त्यासाठी वणवा लावणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. परंतु, त्यापातळीवर उदासिनता आहे. वणवे थांबविण्यासाठी व्यापक जागृती, उपाय का योजले जात नाहीत, असा प्रश्न दरीमाता वृक्षमित्र भारत पिंगळे, शिवाजी धोंगडे यांनी केला आहे.

हेही वाचा…जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना असा काही आनंद की…

वनविभागाने सेवेमधील आक्रमकता वाढवावी. आग लावणा-यांचा कसोशीने शोध घ्यावा. कडक कायदेशीर कारवाईची पावले उचलली पाहिजे. जनजागृती केली पाहिजे. आग विझविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान साहित्य यांचा वापर करावा. घरात बसणाऱ्यांनी आता आग विझविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे आले पाहिजे. अन्यथा आपल्यासह भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आहे. -दत्तु धोंडगे (पर्यावरण मित्र)

वनविभागात वणवा लागू नये, यासाठी वनांमध्ये जाड रेषा, रोपांभोवती गोलपट्टी तयार करण्यात आली आहे. याशिवाय या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रत्येक विभागात एक यंत्र तसेच आधीचे यंत्र असे दोन यंत्र ठेवण्यात आले आहेत प्रत्येक वन विभागात एक फायर वॉचर अर्थात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.– राजेश पवार (वन अधिकारी, त्र्यंबकेश्वर)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising wildfires in nashik district forest and environment department negligence of fire prevention measures psg