जळगाव : काकांचा मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने त्याचा जेवणाचा डबा घेऊन जात असताना काका-पुतण्याच्या दुचाकीला मागून भरधाव मालमोटारीची जोरदार धडक बसली. त्यात अंगावरून मालमोटारीचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे काका गंभीर जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजोग सपकाळे (२०) असे मृत तरुणाचे नाव, तर नवल सपकाळे (४७, दोन्ही रा. गाढोदा, ता. जळगाव) असे गंभीर जखमी झालेल्या काकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांचा मुलगा आकाश सपकाळे याला जळगाव शहरातील आकाशवाणी चौकालगतच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेऊन नवल आणि संजोग हे दुचाकीने जळगावला जाण्यासाठी निघाले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास खोटेनगरकडून शिव कॉलनीकडे जात असताना मानराज पार्कजवळ नवल यांच्या दुचाकीला भरधाव मालमोटारीची धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार काका- पुतणे रस्त्यावर कोसळले. धडकेमुळे काका दुभाजकावर फेकले गेले आणि मालमोटारीच्या चाकाखाली आल्याने संजोग हा चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. काका नवल सपकाळे गंभीर जखमी झाले. मालमोटार धडक दिल्यानंतर शिव कॉलनीकडे भरधाव निघाला. चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर असलेल्या अनेकांनी अपघात पाहिला. त्यांनी थेट मालमोटारीचा पाठलाग करीत शिव कॉलनीच्या पुढे अडविले.

हेही वाचा… महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ कायम

हेही वाचा… मालेगाव : अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

संतप्त जमावाने चालक व सहायक चालकाला मारहाण करीत मालमोटारीच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत माहिती घेतली आणि संजोगचा मृतदेह व जखमी नवल सपकाळे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. पोलिसांनी मालमोटारीसह चालकाला ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो रोज जळगावला येत होता. मृत संजोगच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident in gadhoda village of jalgaon district asj