नातेवाईकाच्या अंतिम संस्कारासाठी दुचाकीवरून निघालेल्या माय-लेकाचा डम्परने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. उंटवाडी रस्त्यावरील खेतवाणी लॉन्ससमोर सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर पळ काढणाऱ्या डम्परचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. डम्परचालकाने मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला. या रस्त्यावर पुढील बाजूस म्हणजे त्रिमूर्ती चौकालगत मागील वर्षी तीन शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर उपरोक्त ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली गेली. या चौकापासून काहीशा अलीकडच्या भागात हा अपघात झाला. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
या अपघातात मानकोरबाई सुरेश जैन-छोरिया (६५) आणि त्यांचा मुलगा विवेक (३५) हे जागीच ठार झाले. गंगापूर रस्त्यावर वास्तव्यास असणारे विवेक हे आईला दुचाकीवर घेऊन मोरवाडीकडे निघाले होते. नातेवाईकाच्या अंतिम संस्कारास उपस्थित राहण्यासाठी ते जात असताना हा अपघात घडला. उंटवाडी रस्त्यावरील सिटी सेंटर मॉललगतच्या सिग्नलहून सुटणारी वाहने त्रिमूर्ती चौकाकडे भरधाव मार्गक्रमण करतात. डम्परचालक तसाच सुसाट निघाला होता. दोंदे पूल ओलांडून पुढे आलेल्या डम्परने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात विवेक आणि मानकोरबाई हे जागीच ठार झाले. आसपासचे नागरिक व अन्य वाहनधारकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. डम्परचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. काही अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले तर काहींनी डम्परचालकाचा पाठलाग करून पकडले. अपघातग्रस्तांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तथापि तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. डम्परचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्यावर जमावाने त्यास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघातात ठार झालेल्या विवेक यांचे आकाशवाणी केंद्राजवळ किराणा दुकान आहे. मोठय़ा भावासमवेत ते हे दुकान चालवितात. या घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय व दुकानात धाव घेतली. विवेक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी डम्परसह चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मालमोटार वा डम्परमुळे शहरात आजवर अनेक अपघात घडून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेशबंदी केली होती. रात्रीच्या वेळी या वाहनांना शहरात येण्याची मुभा दिली गेली. यामुळे काही काळ दुचाकी व अन्य चारचाकी वाहनांसमोर दिवसा अवजड वाहनांचा प्रश्न राहिला नाही. परंतु उपरोक्त नियम पुढे पाळला गेला नाही. कालांतराने तो उठविला गेल्याचे चित्र निर्माण झाले. सध्या दिवस असो वा रात्र भलेमोठे डम्पर आणि अवजड मालमोटारी वाहतूक करताना दिसतात. उंटवाडी रस्त्याच्या पुढील बाजूला त्रिमूर्ती चौकालगत गतवर्षी असाच भीषण अपघात झाला होता. मालमोटारीच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. त्या अपघाताची पुनरावृत्ती झाली. दिवसागणिक अंतर्गत रस्त्यांवर वाढणाऱ्या अपघातांमागे नियमांचे पालन न करणे हे जसे कारण आहे, तसेच वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठीची जबाबदारी असणाऱ्या पोलीस व पालिका यंत्रणेचे दुर्लक्षही कारक ठरल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
डम्परच्या धडकेत माय-लेकाचा अंत
डम्परचालकाने मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला
Written by रोहित धामणस्कर
First published on: 05-01-2016 at 09:58 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident in nashik