जळगाव – महापालिकेतील ठाकरे गटाच्या उपमहापौरांचे निवासस्थान असूनही पिंप्राळा उपनगरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यास प्रशासनास अनेक दिवसांपासून सवड मिळत नव्हती. परंतु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा ठरताच युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यातील खड्डे चक्क डांबराने बुजविल्यामुळे पिंप्राळावासियांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंप्राळा हे ४० हजारपेक्षा अधिक लोकसंख्येचे उपनगर असून, शहरातील गोविंदा रिक्षाथांबामार्गे शाहूनगर, भोईटेनगर रेल्वे उड्डाणपूल अथवा कोर्ट चौकातून गणेश कॉलनीमार्गे बजरंग बोगद्यातून पिंप्राळा उपनगरात येता येते. गणेश कॉलनीतील मुख्य चौकापासून बजरंग बोगदामार्गे पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्डे रस्त्यात अशी स्थिती झाली आहे. वर्षानुवर्षांपासून रस्त्यांची स्थिती अशीच आहे.
हेही वाचा – नाशिक: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हसरुळजवळ जागा; पर्यावरणप्रेमींचा विरोध
महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही फरक पडला नाही. उपनगरातील अंतर्गत रस्त्यांचीही चाळण झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ एप्रिल रोजी पिंप्राळा उपनगरातील मुख्य चौकात शिवस्मारकाचे भूमिपूजन, तसेच पाचोरा येथे शिवसेना नेते दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जाहीर सभा होणार आहे. पिंप्राळा उपनगरातील शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ठाकरे हे विमानतळावरून मोटारीने महामार्गालगतच्या नवजीवन सुपरशॉपमार्गे उड्डाणपुलाखालून पिंप्राळा मुख्य रस्त्याने भूमिपूजनस्थळी जाणार आहेत. या मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात आले.