धुळे – बंदुकीचा आणि चॉपरचा धाक दाखवून शहरातील एका घरावर सशस्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये रोख हिसकावून नेले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे पंजाबी टिंबर मार्ट आहे. या ठिकाणी विनोद भसिन आणि त्यांचा मुलगा विशाल भसिन यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवरुन दरोडेखोरांनी भसिन यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना घरात शिरता आले नाही. यामुळे त्यांनी घराचा दरवाजा तोडला. पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. पाचही दरोडेखोर भसिन यांच्या घरात शिरले. विनोद यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळ झोपलेल्या १० वर्ष वयाच्या नातीलाही चॉपर लावला. ‘आवाज करु नको’ असा दम भरला. यावेळी त्यांनी कपाट आणि तिजोरीतील सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये लुटले. यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा भसिन यांचा मुलगा विशाल याच्या खोलीकडे वळविला. विशाल आणि त्याच्या पत्नीला झोपेतून उठवून त्यांनी सर्वांना एका खोलीत बंद केले.”आवाज करु नका, आम्ही वरच्या मजल्यावर जात आहोत” असे सांगून दरोडेखोर घराबाहेर पडले. दरोडेखोरांनी चेहरा दिसू नये म्हणून माकड टोप्या घातलेल्या होत्या.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा अधीक्षक संजय बारकुंड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी, आझादनगर ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दरोडेखोरांनी हिसकाविलेल्या दागिन्यांपैकी दहा ग्राम वजनाचे सोन्याचे नाणे पोलिसांना मिळून आले.
हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट, कांद्याची कोट्यवधींची उलाढाल ठप्प; आज व्यापाऱ्यांशी चर्चा
दरोडेखोर ज्या मार्गाने आले, त्याच मार्गाने परतल्याच्या काही खुणा पोलिसांना दिसल्या. एका दरोडेखोराने संपूर्ण लूट होईपर्यंत आपल्या हातात बंदूक ठेवली होती, अशी माहिती भसिन कुटूंबियांनी पोलिसांना दिली. हिंदी आणि अहिराणी भाषिक दरोडेखोर भसिन यांच्या कुटूंबियांची किमान जुजबी माहिती असलेले असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. बंगल्याच्या दक्षिण बाजूला रस्ता असून रस्त्यालगत भसिन यांच्या बंगल्याची संरक्षक भिंत आहे. या भिंतीकडे ठेवण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांजवळून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला असावा, असाही निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. घटनास्थळी मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली एक मोटार सायकल पोलिसांना मिळून आली.