लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोयत्याचा धाक दाखवित टोळक्याने दुचाकीस्वारास लुटल्याची घटना ध्रुवनगर येथील हनुमान नगर रस्त्यावर घडली. दुचाकीस्वाराचा भ्रमणध्वनी हिसकावत संशयितांनी ऑनलाईन दोन हजार रुपयांची रोकड लंपास केली. दुचाकीस्वार पळून गेल्याने लुटारुंनी त्याची दुचाकी पेटवून दिली. या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत कौतिक मोहिते (२७, गंमत जंमत हॉटेलजवळ) या युवकाने तक्रार दिली. राहुल जाधव (ध्रुवनगर), महेश शिंदे (निगळ पार्क, शिवाजीनगर), अरबाज शेख (शिवाजीनगर) आणि त्यांचा एक साथीदार अशी संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोहिते आणि त्याचा मित्र शुभम तूपलोंढे (गंगापूर गाव) हे दोघे रात्री दुचाकीने प्रवास करीत होते. हनुमाननगर रस्त्यावर टोळक्याने त्यांना रोखले. कोयत्याचा धाक दाखवत संशयितांनी पैशांची मागणी केली.

दोघांची झडती घेत संशयितांनी मोहितेचा भ्रमणध्वनी हिसकावून घेतला. फोन पेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांची रक्कम अन्य बँक खात्यात वर्ग केली. यावेळी झालेल्या झटापटीत मोहितेने प्रसंगावधान राखत पळ काढला. संशयितांनी त्याची दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत मोटारसायकल जळून खाक झाली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

मद्य परवाना व्यवहारात दीड कोटींचा गंडा

मद्य विक्री परवानाच्या खरेदी- विक्रीत नागपूरस्थित एकास दीड कोटींना गंडा घालण्यात आल्याचे उघड झाले आहे. दोन वर्ष उलटूनही परवाना अथवा पैसे न मिळाल्याने संबंधिताने पोलिसात धाव घेतली. याबाबत मनिष व्यास (४९, लखडगंज, नागपूर) यांनी तक्रार दिली. अमित सानप (अशोका मार्ग), संदीप सुर्वे (जेलरोड) आणि नटेश शिंदे (मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी संशयितांनी व्यास यांच्याशी संपर्क साधत अमित वाइन्स या दुकानाचा परवाना विक्रीला असल्याविषयी सांगितले होते. संबधितांनी विश्वास संपादन केल्याने व्यास यांनी परवाना खरेदी करण्याचे ठरवले. हा व्यवहार साडे सहा कोटींवर निश्चित करण्यात आला. दोन वर्षात संबधितांनी टोकन रकमेसह वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एक कोटी ४२ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. दोन वर्ष उलटूनही परवाना अथवा पैसे पदरात न पडल्याने व्यास यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने फसवणूक

क्रिफ्टो करन्सीच्या गुंतवणुकीतून जादा नफ्याचे अमिष दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील एकास सुमारे ७६ लाखांना गंडा घातला. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात तक्रारदाराशी संशयितांनी संपर्क साधला होता. फेसबुक आणि व्हॉटसॲपच्या माध्यमातून चॅटिंग करणाऱ्या संशयितांनी व्हॉटसॲप गटात समाविष्ट करुन तक्रारदारास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. नंतर तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यात गुंतवणुकीची रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. तक्रारदाराने तब्बल ७५ लाख ९५ हजार ६० रुपये संशयिताना ऑनलाईन वर्ग केले. परंतु, सहा महिने उलटूनही मुद्दल व नफा पदरात पडला नाही. सहा महिन्यानंतर संशयितांशी संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजेच्या धक्क्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

ध्रुवनगर भागात सिमेंट मिक्सरवर काम करताना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षाच्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. निशांत बागूल (२५, म्हाडा वसाहत, पपया नर्सरीजवळ) असे मृत मजुराचे नाव आहे. बागूल रविवारी सायंकाळी दुर्गेश चित्ते फार्म हाऊस या ठिकाणी नव्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत होता. सिमेंट मिक्सरवर काम करताना अकस्मात वीज प्रवाह उतरल्याने धक्का लागला. या घटनेत तो बेशुध्द पडल्याने अन्य कामगारांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू

एकलहरे-नाशिकरोड मार्गावर दुचाकीवरून पडल्याने ५१ वर्षाच्या चालकाचा मृत्यू झाला. नीलेश छाजेड (प्राईड गणेश रो हाऊस, तोफखाना रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. छाजेड रविवारी रात्री एकलहरे येथून नाशिकरोडच्या दिशेने दुचाकीने प्रवास करीत होते. ट्रॅक्शन समोरील गतिरोधकावर दुचाकीवरून ते पडले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.