कुंभमेळ्यासाठी रामकुंड परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे सत्र पर्वणीनंतरही सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात घडलेल्या चोरीच्या आठ घटनांमध्ये चोरटय़ांनी साडे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड तसेच अन्य ऐवज लंपास करत खऱ्या अर्थाने ‘पर्वणी’ साधली. भुरटय़ा चोरटय़ांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणेने दक्षता बाळगावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
नाशिक येथे दुसऱ्या शाही स्नानासाठी लाखोंहून अधिक भाविकांची मांदियाळी रामकुंड परिसरात झाली होती. स्नानाचा आनंद घेणाऱ्या भाविकांच्या बेसावधपणाचा फायदा चोरटय़ांनी घेतला. दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी, रोकड व तत्सम साहित्य लंपास झाल्याचे १४ गुन्हे पंचवटीसह अन्य पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. मंगळवारी हे सत्र सुरूच राहिले. सिंहस्थामुळे सध्या रामकुंड परिसरात हजारो भाविक स्नान करण्यासाठी येत आहेत. चोरटय़ांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन, मंगळसूत्र, भ्रमणध्वनी असा साडे तीन लाखांचा ऐवज, २९ हजाराची रोकड लंपास केली. शाही पर्वणीची गर्दी टाळत रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या राजीवनगर येथील महिला कपालेश्वर परिसरात दर्शनासाठी जात असताना चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढून नेले. धुळे तालुक्यातील रहिवासी असलेल्या शंकुतला गुजर यांनाही तशाच प्रसंगाचा सामना करावा लागला. चोरटय़ाने त्यांची ६७ हजार रुपयांची मंगलपोत लंपास केली. मखमलाबाद येथील महिला रामकुंड परिसरात कुटूंबिया समवेत स्नान करत असतांना चोरटय़ांनी नातेवाईकांकडील मौल्यवान ऐवजासह मंगळसूत्र गायब केल्याचे निदर्शनास आले. नाशिकरोड येथील भाविकाकडील ४० हजाराहून अधिक किंमतीचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. गांधी चौकात उभ्या असलेल्या गृहस्थाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटय़ाने लंपास केली. स्थानिकांसोबत परराज्यातुन आलेले भाविकही चोरटय़ांच्या कचाटय़ात सापडले.
राजस्थानच्या भाविकाला एकाने धक्क्याच्या बहाण्याने त्यांच्या हातातील बॅग खेचून घेत २९ हजार रुपयाची रोकड व भ्रमणध्वनी लंपास केला. हे सर्व गुन्हे पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आहे आहेत.

Story img Loader