नोकराकडून सोन्याची बिस्किटे, रोकड लंपास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसच्या प्रवक्त्या तथा नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या टिळकवाडी परिसरातील घरातून नोकराने सोन्याची बिस्किटे आणि रोकड असा सुमारे १५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. साधारणत: महिनाभरापूर्वी घडलेला हा प्रकार किमती वस्तू कपाटात दिसत नसल्यावर लक्षात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नोकर परभणी येथे सोन्याची बिस्किटे विकताना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्याला लवकरच नाशिकचे पोलीस ताब्यात घेणार आहेत.

या चोरीसंदर्भात डॉ. हेमलता पाटील यांचे पती निनाद यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहरातील टिळकवाडी भागात पाटील यांचा ‘दौलत’ हा बंगला आहे. या ठिकाणी काही वर्षांपासून बंडू म्हसे हे नोकर म्हणून काम करतात.

चार-पाच महिन्यांपूर्वी म्हसे यांचा मुलगा आकाशही बंगल्यात कामासाठी आला. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून जानेवारी महिन्यात बॅगमधून कपाटाची चावी चोरली आणि कपाटातील

सोन्याची पाच बिस्किटे आणि १० हजारांची रोकड काढून घेतली. नंतर संशयिताने कामावर येणे बंद केले. त्याचे वडील कामावर येत होते.

आकाश परभणी जिल्ह्य़ातील सेलू या मूळ गावी गेल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी रात्री पाटील यांनी कपाट उघडले असता त्यात सोन्याची बिस्किटे, रोकड नसल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची पोलिसांना माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी परभणी पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा सेलू गावातील आकाश नावाच्या संशयिताला सोन्याची बिस्किटे विक्री करताना पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. त्या प्रकरणात परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.