जळगाव : उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केल्यानंतर मनसेची अडचण वाढली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी समाज माध्यमात आपली भूमिका मांडली. या प्रकरणामागे महाशक्ती म्हणजेच भाजपचा तर हात नाही ना, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात विशेषतः मुंबईत मराठीचा प्राधान्याने वापर व्हावा. बँकांमध्येही मराठी भाषा वापरली जावी, अशी मागणी करत नुकतीच आंदोलने करण्यात आली. उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी तोच मुद्दा हाताशी धरून मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार आहे, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक संदेश समाज माध्यम ‘एक्स’ वर टाकला आहे. ज्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांचा एक फोटोही जोडला आहे. रोहिणी खडसे यांनी त्यात म्हटले आहे, की मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध स्वरूपाचे इशारे दिले जात आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. काही पक्षांना मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे आणि एकूणच महाराष्ट्र व मराठी माणसांचे वावगे आहे. कारण, याआधीही मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) फोडले गेले आहेत.

यासह रोहिणी खडसे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तुम्ही एकदा तपासून पाहा. मनसेला लक्ष्य करणाऱ्यांच्या मागे कुठे एखादी महाशक्ती तर नाही ना, असेही म्हटले आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठींबा देऊन मविआच्या विरोधात भूमिका घेतलेली असतानाही, रोहिणी खडसे यांनी मागचे सर्व विसरून त्यांची पाठराखण केली आहे. मनसेला त्यामुळे मोठा आधार मिळाल्याचे बोलले जात आहे. अडचणीत सापडलेल्या भावाच्या मदतीसाठी एक बहीण वेळेवर धाऊन आल्याची प्रतिक्रिया देखील काहींनी एक्सवर टाकली आहे.