जळगाव : आपसात मोठे मतभेद असलेले महायुती सरकार आज नाहीतर उद्या अडखळून पडणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वर्तविले आहे. चैत्यभूमीवरील कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिलीच नाही. त्यावरून रोहिणी खडसे यांनी महायुतीच्या सरकारला डिवचले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रम पत्रिकेत राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भाषण करणार असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कसे सोयीस्कररित्या बाजूला सारले गेले, हे दाखविण्यासाठी रोहिणी खडसे यांनी राजभवनाने जारी केलेल्या राज्यपालांच्या कार्यक्रमाची पत्रिका आपल्या एक्सवरील संदेशाबरोबर जोडली आहे. ज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा स्पष्टपणे उल्लेख दिसत आहे. एक्सवरील संदेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाई, असा उल्लेख करून त्यांच्यासह अजित पवार यांची सध्या महायुतीच्या सरकारमध्ये कशी कोंडी होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

दादा डोईजड होत आहेत म्हणून आधी मंत्रालयातील फाईली भाईंकडे पाठविण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत आणि पालकमंत्री पदातही भेदभाव केला, असाही आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रायगडावर अजितदादांना डावलून भाईंना (एकनाथ शिंदे) बोलण्याची संधी दिली. मात्र, भाई दोन पाऊल पुढचे निघाले. मोटा भाय मुंबईत आल्यावर एकटेच जाऊन पाऊण तासाची बैठक करून आले. भाई पण जास्तच पुढे पुढे करताहेत, हे लक्षात आल्यावर मग दोघांना जागेवर आणण्यासाठी थेट भाई-दादांचे चैत्यभूमीवरील भाषण कापून टाकले. एकंदरीत काय तर सरकार असे चालू आहे. प्रचंड ओढाताण, प्रचंड रस्सीखेच…एकमेकांच्या पायात पाय…आज नाहीतर उद्या अडखळून पडणार हे निश्चित, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.