जळगाव : एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. राज्यातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची कन्या तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी आपल्या फेसबुक पानावर असलेले एकनाथ खडसे यांचे छायाचित्र हटविले आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे. शरद पवार यांनी गेल्या साडेतीन वर्षांत आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. म्हणूनच पवार यांना सोडून जाणे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे मी याच पक्षात थांबले आहे. पक्षात यापुढेही जोमाने काम करून पक्षाचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार आहे, अशा शब्दांत अॅड. रोहिणी खडसे यांनी भूमिका स्पष्ट केली होती.
हेही वाचा…नवमतदारांच्या नोंदणीत नाशिकची आघाडी
एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कोण, यावर काही दिवसांपासून चर्चेचे गुर्हाळ सुरू होते. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अॅड. रोहिणी खडसे आणि जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर रावेरचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
वडील एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत. मात्र त्यांची कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने तिसर्यांदा उमेदवारीची संधी दिली आहे. आता सासरे आणि सून एकाच पक्षात, तर वडील व कन्या वेगवेगळ्या पक्षात असतील. यामुळे अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यांच्या फेसबुक पानावर असलेले वडील एकनाथ खडसे यांचे छायाचित्र हटवले आहे. अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाकडून मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
वडील खडसेंसोबत अनेक वर्षे मी काम करीत आले आहे. त्यांच्या निर्णयामुळे एकटे पडल्यासारखे वाटत आहे. कोणत्या पक्षात थांबायचे, कुठे काम करावे आणि कुठे काम करू नये, याबाबत कळते. कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही. भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहणार असून, पक्षातील प्रत्येक जण माझ्यासोबत आहे. आता मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे, असे अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी नमूद केले आहे.