लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: आगामी काळात होणार्‍या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे. यापूर्वी झालेल्या अधिवेशनात भाजपचा कोणताही खासदार या विषयावर बोललेला नाही, याची आठवण करुन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी आतातरी यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार पवार सोमवारी धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जालना घटनेत पोलिसांच्या लाठीमाराच्या क्रियेवर आंदोलकांकडून प्रतिक्रिया उमटली. याकडे दुर्लक्ष करुन सरकारकडून आधी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, आधी दगडफेक झालीच नव्हती, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने रोहित पवार यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. अडचणीत आलेले यंत्रमागधारक, कामगार, मालक तसेच संलग्न लहान मोठ्या उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी विशेष योजना आणावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा… Brahmagiri Shravan Somwar: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

धुळे जिल्ह्यात यंत्रमाग हा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात विविध समस्यांमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे, त्यात दोन वर्षात अनेक यंत्रमाग बंद झाले. आपली सत्ता आल्यास या व्यवसायाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, असलम खाटीक, कादीर अन्सारी, हाजी हासिम कुरेशी यांनी पवार यांचा यावेळी सत्कार केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar criticized bjps mp for keeping silence on maratha aarkashan in parliament dvr
Show comments