आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीव्दारे प्रत्येकी १२ जागा लढवण्याचा प्रस्ताव वंचितने दिला आहे. हा प्रस्ताव चांगला असून तो महाविकास आघाडीने स्विकारावा म्हणजे आम्ही त्यांचे १२ वाजवायला मोकळे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी हाणला आहे.

धुळे जिल्हा दौर्‍यावर आलेले आठवले यांनी विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी दोन जागा रिपाइं भाजपशी युती करुन लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा अधिक जागा मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकेल. मोदींच्या पाठीशी जनता आहे. इंडिया नावाने जरी विरोधक एकत्र आले तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यांचा कोणी एक नेता नाही.

हेही वाचा >>> ‘मॅट’चा प्रविण पाटील यांना दिलासा; शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायम ठेवण्याचा निर्णय

संविधान बदलणार, असा खोटा प्रचार विरोधकांकडून वारंवार केला जातो. वास्तविक, २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस नरेंद्र मोदी यांनीच सुरु केला. आपण सोबत असतांनाही काँग्रेसला कधी संविधान दिवस आठवला नव्हता, असा चिमटा आठवले यांनी काढला. देशभरात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक, त्यांच्या देश-विदेशातील वास्तु विकसीत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनीच केले. संविधानाचा आदर आणि संविधानानुसारच ते देशाचा कारभार करीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला दलित समाजाने बळी पडू नये, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. अयोध्येत राममंदिर निर्माण होत असल्याचा आपल्याला आनंदच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही हिंदू समाजाला सोबत घेण्याचाच विचार होता. देशात सर्वांनी बंधूभावाने एकत्र राहावे, हाच आमचा विचार आहे. अयोध्देत राम मंदिर होते तसे अडीच हजार वर्षांपूर्वी बौध्द मंदिर होते. मात्र हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या वादात आम्ही पडलो नाही. राम मंदिराच्या उदघाटनाला विरोधी पक्षांनी यावे, असेही आवाहन आठवले यांनी केले. पत्रकार परिषदेवेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, संजय बैसाणे, चंद्रमणी खैरनार, राजुबाबा शिरसाठ, नैनाताई दामोदर, पंकज साळुंखे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi leader ramdas athawale slams maha vikas aghadi over prakash ambedkar seat sharing formula zws