नाशिक – राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी सातत्याने अफवा पसरविल्या जात आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी अशा पध्दतीने गैरसमज पसरविणे निश्चितच गंभीर आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. शहरात शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोगांच्या नियोजनासंदर्भात आले असता खासदार कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय हा कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोकाटे प्रकरणी न्यायलयाने केलेली टिप्पणी सामान्य माणसाला अगतिक करणारी आहे. न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. मस्साजोगची घटना असो किंवा अहिल्यानगर येथील १८ वर्षाच्या युवकाची हत्या असो. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, असे खासदार कोल्हे यांनी नमूद केले.