सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे जनजागृती
नाशिक : नवरात्र तसेच इतर सण/धार्मिक उत्सवप्रसंगी धार्मिक स्थळापासून मशाल पेटवून अनवाणी धावत आपल्या शहर, गावात नेण्याचे प्रकार वाढले असून यात युवकांचा अधिक सहभाग असतो. रहदारीच्या रस्त्यावरून कित्येक किलोमीटर मशाल घेऊन धावण्यामुळे आता जिवाला धोका निर्माण झाला असून सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे या विषयाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटेजवळ अशाच एका घटनेत तुळजापूरहून ज्योत घेऊन निघालेल्या अनेक युवकांना कंटेनरची धडक बसून ते जखमी झाले. दोन जणांना जीव गमवावा लागला. तुळजापूर येथून ज्योत अर्थात मशाल घेऊन गावी परतणाऱ्या तरुणांच्या जथ्यााला नांदुरशिंगोटे येथे कंटेनरने धडक दिली. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. जखमी आणि मृत झालेले युवक इगतपुरी तालुक्यातील आहेत. नवरात्रोत्सवात किंवा अन्य सणांच्या मशाल घेऊन धावणारे युवक महामार्गावर दृष्टिपथास पडतात. मुंबईहून शिर्डीकडे जाणाऱ्या महामार्गावरही मशालधारींची मोठी गर्दी असते. वर्गणी गोळा करून एखाद्या वाहनाने प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी जायचे. तिथे एक मशाल पेटवायची आणि ती न विझवता अनवाणी पायाने एकेकाने धावत आपल्या शहर, गावी आणायची असे केले जाते.
वर्गणी जमा करण्यापासून तर गावात मशाल आणेपर्यंत जवळपास आठ ते दहा दिवस जातात. यात वेळ आणि धावण्यामुळे श्रमही वाया जात असल्याचे सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. हा वेळ, पैसा आणि श्रम आपल्याच गावातील एखाद्या सामाजिक उपक्रमात कामी आल्यास मोठे काम उभे राहू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हे सर्व चित्र अस्वस्थता निर्माण करणारे असून जग मंगळावर जात असताना आपण प्रथांमध्ये गुरफटून घेणार आहोत का, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या नादात दरवर्षी रस्त्यावर अनेक घरांतील कर्ते तरुण मशाली घेऊन धावतात आणि त्यातील अनेक हकनाक अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. दोन तरुणांचा अपघाती मृत्यू आणि १८ जखमींच्या अपघातातून आपण काही बोध घेणार आहोत की नाही, असा प्रश्नही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
अशा प्रथा बंद करण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवे. श्रद्धाच असेल तर ती गावातील मंदिरात जाऊनही व्यक्त करता येईल. त्यासाठी कित्येक किलोमीटर अंतर मशाल घेऊन धावण्याची गरज नाही, हे प्रबोधन आपापल्या गावात सर्वानी केले तरच हळूहळू या जीवघेण्या प्रथा बंद होतील. समाजमाध्यमांचा प्रचार-प्रसारासाठी उपयोग करत जनजागृतीद्वारे मुलांचे बळी थांबवता येऊ शकतात.
– प्रमोद गायकवाड (प्रमुख, सोशल नेटवर्किंग फोरम)